कराची : पाकिस्तानच्या पुढे असणाऱ्या अडचणी दिवसागणिक वाढत असताना त्यात आता नव्याने आणखी एक भर पडली आहे. ज्यामुळे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही नाराज असल्याचं कळत आहे. येत्या काळात इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाची सुरु असणारी तयारी पाहता खान यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि अन्य सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवड प्रक्रियेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला १९९२ मध्ये विश्वचषक जिंकून देण्याऱ्या आणि सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या इम्रान खान यांनी संघाच्या निवड प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असल्याचा मुद्दा मांडत विश्वचषकासाठी पाकिस्तानचा सर्वोत्तम संघ पाठवण्यात येण्याचीही बाब समोर ठेवली आहे.  


पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या कार्यकारिणीलाही सध्या अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. सहा महत्त्वाच्या खेळाडूंना सध्या सुरु असणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी न निवडता त्यांना विश्रांती देण्यामागचं नेमकं कारण काय, असा प्रश्न अनेक स्तरांतून उपस्थित करण्यात येत आहे. 


पाकिस्तानच्या संघातून कर्णधार सरफराज अहमद, फखर जमान, हसन अली, बाबर आझम आणि शाहीन शाह आफ्रिदी या खेळाडूंना सध्या विश्रांती देण्यात आली आहे. त्याशिवाय निवडकर्त्यांनी ऑलराऊंडर फहीम अशरफलाही दुसऱ्या सामन्यानंतर संघातून वगळलं गेलं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही एकंदर भूमिका आणि भवितव्यात संघाची कामगिरी या मुद्द्यांमुळे इम्रान खान चिंताग्रस्त असल्याचं कळत आहे. 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी खान यांना निवड प्रक्रियेत सुसूत्रता आणत जास्तीत जास्त चांगल्या संघाची निवड करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याची हमी दिली. शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या पाकिस्तान प्रिमीयर लीगच्या सर्व सामन्यांचं आयोजन हे फक्त कराची आणि लाहोरमध्येच न करता पाकिस्तानातील सर्व भागांमध्ये आयोजित केले जावेत अशी मागणीही खान यांनी केली आहे.