नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या विद्यार्थ्यांशी 'परीक्षा पे चर्चा' केली. या चर्चेवेळी मोदींनी भारतीय क्रिकेटपटूंनी निराश न होता संघर्ष करुन विजय मिळवला असं सांगितलं. हे सांगताना मोदींनी व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांचं उदाहरण दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदींनी सोमवारी (२० जानेवारी) दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपण अपयशी झालो तरी यशाचं शिक्षण घेऊ शकतो. जर अपयशी झालात तर याचा अर्थ तुम्ही यशाकडे आगेकूच केली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी पराभवाला विजयामध्ये बदलवलं होतं. तर अनिल कुंबळे गंभीर दुखापत झालेली असतानाही खेळला, असं मोदी म्हणाले.


मोदींनी सगळ्यात पहिले २००१ साली कोलकात्यात झालेल्या ऐतिहासिक मॅचचा दाखला दिला. ही मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाली होती. या मॅचबद्दल सांगताना मोदी म्हणाले, '२००१ साली भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कोलकात्यात टेस्ट मॅच सुरु होती. मॅचमध्ये भारताची परिस्थिती खराब होती. भारताला फॉलोऑन मिळाला होता. दुसऱ्यांदा बॅटिंगला आल्यानंतरही पटापट विकेट पडल्या. परिस्थिती निराशाजनक झाली होती. प्रेक्षकही नाराजी व्यक्त करत होते. आपलेच खेळाडू खेळत आहेत, त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे, हे प्रेक्षक विसरतात. पण लक्ष्मण आणि द्रविडने त्यादिवशी कमाल केली. दोघंही दोन दिवस खेळले आणि परिस्थिती बदलून टाकली. एवढच नाही भारताने ती मॅचही जिंकली.'


पंतप्रधानांनी दुसरं उदाहरण २००२ सालच्या मॅचचं दिलं. '२००२ सालीही अशीच एक मॅच झाली. तेव्हा भारतीय टीम वेस्ट इंडिजमध्ये खेळायला गेली होती. अनिल कुंबळेच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली. एवढ्या गंभीर दुखापतीमध्येही कुंबळेने बॉलिंग केली. कुंबळे खेळला नसता तरी देशाने त्याला दोष दिला नसता, पण तरीही तो जबड्याला पट्टी बांधून खेळला. त्यावेळी ब्रायन लाराची विकेट घेणं मोठी गोष्ट होती. कुंबळेने लाराला पॅव्हेलियनमध्ये पाठवून मॅच पलटवून टाकली,' असं वक्तव्य मोदींनी केलं.


या दोन्ही मॅचवेळी निराशेचं वातावरण होतं. पण त्यांनी संकल्प केला एकत्र येऊ पण हारणार नाही. या संकल्पाचा सकारात्मक परिणाम झाला. एका व्यक्तीचा संकल्प इतरांसाठीही प्रेरणादायी ठरतो, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.