यह `दीवार` टूटती क्यों नहीं है? भारतीय हॉकी संघाची `द वॉल` श्रीजेशला विजयी निरोप
Paris Olympic 2024 : पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठीच्या सामन्यात टीम इंडियाने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयाबरोबरच भारतीय हॉकी संघाने गोलकिपर पीआर श्रीजेशला विजयी निरोप दिला.
Paris Olympic 2024 : हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठी (Bronze Medal) झालेल्या सामन्यात टीम इंडियाने (Indian Hockey Team) स्पेनचा चुरशीच्या लढतीत 2-1 असा पराभव करत पदक निश्चित केलं. तब्बल 52 वर्षांनी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकण्याची कमाल भारतीय हॉकी संघाने केली आहे. भारताच्या या विजयात मोलाची भूमिका बजावली ती गोलकिपर पीआर श्रीजेशने (pr sreejesh). कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा खेळणारा श्रीजेश भारतीय गोलपोस्टसमोर पहाडासारखाा उभा राहिला. सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं, पण कर्णधार हरमनप्रीत आणि गोलकिपर पीआर श्रीजेशच्या दमदार कामगिरीमुळे भारताने कांस्य पदकाची कमाई केलीच.
श्रीजेशची कारकिर्द
पीआर श्रीजेशने 2006 मध्ये भारतीय हॉकी संघात पदार्पण केलं, आणि अल्पावधीतच तो भारतीय हॉकी संघाचा द वॉल म्हणून ओळखला जाऊ लागला. 2014 एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि 2018 एशियन गेम्समध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलंय. याशिवाय 2018 एशियाई चॅम्पियन्स ट्ऱॉफीचं संयुक्त विजतेपद, भुवनेश्वरमध्ये 2019 साली झालेल्या एफआयएच पुरुष सीरिज फायनलचं सुवर्णपदक आणि बर्मिंघम 2022 कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघातून श्रीजेशने दमदार कामगिरी केलीय.
ग्रेट ब्रिटेनविरुद्ध यादगार सामना
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पीआर श्रीजेशसाठी सर्वात यादगार सामना राहिला तो म्हणजे ग्रेट ब्रिटेनविरुद्ध क्वार्टर फायनलचा सामना. या सामन्यात तब्बल 43 मिनिटं भारतीय हॉकी संघाला 10 खेळाडूंनी खेळावं लागलं. बचावपटू अमित रोहिदासला रेड कार्ड दाखवण्यात आलं. पण श्रीजेशने विरोधी संघाचा हल्ला यशस्वीपण परतवून लावत हा सामना टीम इंडियाला जिंकून दिला. या विजयामुळे भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली. आता कांस्यपदाकसाठीच्या सामन्यातीह श्रीजेशने स्पेनसमोर भक्कमपणे उभा राहिला. अखेरच्या काही मिनिटात स्पेनला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण श्रीजेशने स्पेनचं आक्रमक यशस्वी होऊ दिलं नाही.
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीच पीआर श्रीजेशने हॉकीतून निवृत्तीची घोषणा केली होती. पीआर श्रीजेश भारतासाठी तब्बल 18 वर्ष खेळत असून यात तो 336 सामने खेळला आहे. श्रीजेशचं हे चौथं ऑलिम्पिक होतं. याशिवाय कॉमनवेल्थ, एशियन गेम्स आणि वर्ल्ड कपमध्येही श्रीजेश खेळलाय. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने पटकावलेल्या कांस्य पदकात श्रीजेशची महत्त्वाची भूमिका होती.
श्रीजेशचे पुरस्कार
पीआर श्रीजेशला 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 'वर्ल्ड गेम्स एथलीट ऑफ द ईयर' चा पुरस्कार जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. 2021 आणि 2022 अशी सलग दोन वर्ष त्याला एफआयएच 'गोलकीपर ऑफ द ईयर' च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. गेल्या वर्षी झालेल्या एशियाई गेम्समध्ये श्रीजेशने केलेल्या भक्कम बचावामुळे भारतीय हॉकी संघाने सुपर्ण पदक जिंकलं आणि पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय केलं.