Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताच्या खातात आतापर्यंत केवळ तीन कांस्य पदकच (Bronze Medal) जमा झालीत. तीनही पदकं नेमबाजीतून मिळालीत. कुस्ती आणि हॉकीत भारताला हातातोंडाशी आलेली पदकं गमवावी लागली. जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारतीय हॉकी संघाला (India Hockey Team) सेमीफायनलमध्ये जर्मनीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. कुस्तीपटू निशा दाहियाला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. तर संपूर्ण देशाचं लक्ष असलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) वजन वाढल्याने अपात्र ठरवण्यात आलं.  50 किलो फ्रिस्टाईल प्रकारात विनेश फोगाटने अंतिम फेरीत धडक मारली. पण ऐन सामन्याच्या दिवशी वैद्यकीय तपासणीत तिचं वजन 100 ग्रॅमने वाढलेलं आढळलं. यामुळे ऑलिम्पिक समितीने तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनेश फोगाटनंतर आता नवा वाद
विनेश फोगाटचा वाद ताजा असतानाच आता भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पंघालच्या (Antim Panghal) वजनावरुन नाव वाद निर्माण झाला आहे. अंतिम पंघालला ऑलिम्पिकच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 19 वर्षीय अंतिम पंघालचं ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. अंतिमकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या वर्षी अंतिमने वर्ल्ड ज्यूनिअर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. तर सीनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्राँझ मेडलची कमाई केली. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण पहिल्याच सामन्यात अंतिम पंघालला 0-10 ने पराभव पत्करावा लागला.


सामन्याआधी 2 दिवस उपाशी?
अंतिम पंघालची पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा असली तरी 10-0 ने पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे. आता अंतिमच्या पराभवामागे खळबळजनक दावा केला जात आहे. अंतिम पंघाल 53 किलो फ्रिस्टाईल वजनी गटात खेळत होती आणि हे वजन टिकवण्यासाठी ती सामन्याआधी दोन दिवस चक्क उपाशी असल्याचं बोललं जात आहे. रिकाम्या पोटाने ती कुस्तीचा सामना खेळल्याचं समोर आलं आहे. 


सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्ह
आधी विनेश फोगाट आणि आता अंतिम पंघालमुळे भारतीय कुस्तीपटूंबरोबर असलेल्या सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सेमीफायनलला व्यवस्थित वजन असलेल्या विनेश फोगाटचं दुसऱ्या दिवशी फायनलच्यावेळी वजन कसं वाढलं, अंतिम पंघाल सामन्याआधी दोन दिवस उपाशी का राहिली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  पॅरिस ऑलिम्पकमधील भारतीय पथकाचे 'शेफ दी मिशन' गगन नारंग यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. 


पॅरिस ऑलिम्पिकनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. यावर आता केंद्रीय क्रीडा मंत्री काय भूमिका घेतात याकडेही देशाचं लक्ष लागलं आहे.