Paris Olympics 2024 Swapnil Kusale Wins Medal: पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या स्वप्निल कुसळेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कोल्हापूरच्या स्वप्निल कुसळेने 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारामध्ये पदकावर आपलं नाव कोरलं आहे. त्याने कांस्यपदक पटकावलं आहे. हे ऑलम्पिकमधील भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. या आधी भारताने नेमबाजीमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. विशेष म्हणजे भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन मेडल मिळाले आहेत. 


किती पॉइण्ट्स मिळवले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्निलने 451.4 पॉइण्ट्स पटकावत कांस्य पदकावर नाव कोरलं. विशेष म्हणजे पात्रता फेरीमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या चीनच्या लियूनेच सुवर्णपदक पटकावलं. लियूने एकूण 463.9 पॉइण्ट्स मिळवले. तर युक्रेनचा सेरहिय कुशिकने 461.3 पॉइण्ट्स मिळवत दुसरं स्थान पटकावलं. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये स्वप्निल सहाव्या स्थानी होता. त्याने मजल दरमजल करत पाचव्या, चौथ्या स्थानी झेप घेत अखेरच्या फेरीमध्ये तिसरं स्थान निश्चित केलं.


पात्रता फेरीतील कामगिरी


स्वप्निलने पात्रता फेरीमध्ये एकूण 590 गुांची कमाई केली होती. गुडघे टेकून लक्ष्यभेद करण्याच्या प्रकारामध्ये स्वप्निल 198 (99,99) कमाई केलेली. तर प्रोन प्रकारामध्ये 197 (98,99) गुण मिळवल होते. उभं राहून लक्ष्यभेद करण्याच्या प्रकारामध्ये स्वप्निलने 195 (98,97) गुण मिळवलेले. पात्रता फेरीमध्ये तो सहाव्या स्थानी होता. याच स्पर्धेमध्ये भारताचा ऐश्वर्य प्रतास सिंह तोमर 11 व्या स्थानी राहिल्याने स्पर्धेतून बाहेर पडला.


धोनीला मानतो आदर्श


स्वप्निलचा आदर्श हा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आहे. धोनीच्या शांत आणि संयमी राहण्याच्या स्वभावाचा आपल्यावर फार मोठा प्रभाव असल्याचं स्वप्निलनेच सांगितलं आहे. पात्रता फेरीमध्ये टॉप 8 मध्ये राहून पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर स्वप्निलनेच हा खुलासा केला. "मी रेंजवर असता मला फार गप्पा मारायला आवडत नाही. शांत आणि संयमी राहण्यास माझं प्राधान्य असतं. अचूक लक्ष्यभेद करण्यासाठी मला या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. मी धोनीचा फार मोठा चाहता आहे. मैदानामध्ये कितीही तणाव असला तरी तो शांत अन् संयमी असतो. मला हे फार भावते. मलाही अशाच पद्धतीने वावरायला आवडतं," असं स्वप्निल म्हणाला. विशेष म्हणजे धोनी आधी ज्याप्रमाणे तिकीट तपासणीस म्हणजेच टीसी म्हणून काम करायचा त्याप्रमाणे स्वप्निलही टीसीच आहे. कोल्हापूरमधील कांबळवाडी गावात जन्मलेला 29 वर्षीय स्वप्निल मागील 12 वर्षांपासून ऑलिम्पिकसाठी प्रयत्न करत होता.