पीसीबीचं पाकिस्तानी खेळाडूंना गाजर, टी-20 वर्ल्ड कप जिंका अन् `इतके` कोटी मिळवा
T20 World Cup 2024 : न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत सोडवता आल्यानंतर आता पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचे डोहाळे फुटले आहेत. अशातच पीसीबी अध्यक्षांनी (Mohsin Naqvi) काय घोषणा केली? पाहा
Mohsin Naqvi On T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) गुरुवारी आयर्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी 18 सदस्यीय संघाची घोषणा केली. मात्र, पीसीबीने अद्याप अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2024) संघ जाहीर केला नाही. त्यामुळे आता पाकिस्तान संघ कधी जाहीर करणार? असा सवाल विचारला जातोय. अशातच पाकिस्तानचा संघ जाहीर झाला नसला तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हवेत असल्याचं पहायला मिळतंय. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी (Mohsin Naqvi) यांनी खेळाडूंना गाजर दाखवलंय. अजून टीम जाहीर झाली नाही पण अध्यक्षांनी थेट बक्षिसच जाहीर केलंय.
पाकिस्तानचा संघ जर यंदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तर प्रत्येक खेळाडूला 1,00,000 डॉलर म्हणजेच 2.77 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल, असं गरिबीत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. मोहसीन नकवी यांनी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तानच्या टीमच्या खेळाडूंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी खेळाडूंशी चर्चा केली अन् त्यानंतर त्यांनी बक्षिसाची घोषणा केली.
येत्या 25 मे पर्यंत पाकिस्तान संघाला टीम जाहीर करता येणार आहे. जर तोपर्यंत पाकिस्तान संघ जाहीर झाला नाही, तर संघ वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद होऊ शकतो. यंदाचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप पाकिस्तान बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळेल. वनडे वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मानहाणीकारण पराभवानंतर आता पाकिस्तानचा संघ कशी कामगिरी करणार? यावर मोठा प्रश्नचिन्ह अद्यापही आहे.
दरम्यान, आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आता पाकिस्तान क्रिकेट संघाने तयारी सुरू केली आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये गेल्या 5 महिन्यांपासून सुरू असलेलं वादळ आता शांत झाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम (Babar Azam) याच्या खांद्यावर पुन्हा संघाची जबाबदारी दिली. तर इमाद वसिम (Imad Wasim) आणि मोहम्मद आमिर यांना पुन्हा संघात स्थान मिळालंय.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, इरफान खान, नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि उस्मान खान.