Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? वर्ल्ड कप पराभवानंतर `या` दोन दिग्ग्जांची हकालपट्टी
PCB selection committee : वनडे वर्ल्ड कप आणि टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दोन सिलेक्टर्सची हकालपट्टी केली आहे.
Pakistan Cricket selection committee : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये (PCB) खळबळ उडाल्याचं मिळतंय. भारतात झालेल्या वर्ल्ड कपमधून सुपडा साफ झाल्यानंतर बाबर आझम (Babar Azam) कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. मात्र, टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी बाबर आझमच्या खांद्यावर पुन्हा जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, तरी देखील पाकिस्तान सुधरल्याचं दिसलं नाही. आता वर्ल्ड कप पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तडकाफडकी निर्णय घेतला असून दोन दिग्ग्जांची थेट हकालपट्टी केली आहे.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपआधी पाकिस्तानातील पंजाब राज्याचा क्रीडा मंत्री, वहाब रियाज (Wahab Riaz) याची पाकिस्तानचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली होती. अशातच आता वहाब रियाझ आणि अब्दुल रझाक यांना आता घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. अब्दुल रझाक हे महिला संघाचे सिलेक्टर होते. मात्र, त्यांना देखील आता नारळ देण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याची जाहीर घोषणा केल्याने आता पीसीबीची क्रिडाविश्वात खिल्ली उडवली जात आहे.
पाकिस्तान पुरुष संघाचे संचालक मोहम्मद हफीज यांच्याशी वहाब रियाझचे चांगले संबंध असल्याने त्याला थेट मुख्य निवडकर्ता म्हणून जबाबदारी देण्यात आल्याची चर्चा होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने झालेली चूक सुधरण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मागील 4 वर्षात 6 चीफ सिलेक्टर बदलल्याने पाकिस्तानचं काय होणार? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
वहाब रियाझचं करियर
2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वहाबने 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत 237 विकेट्स घेतल्या आणि तीन फॉरमॅटमध्ये 1200 धावा केल्या आहेत. आयसीसीच्या इवेंट्समध्ये 35 विकेट्स नोंदवणारा तो वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.