मुंबई : २०२१ साली भारतामध्ये टी-२० वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे संचालक समी उल हसन बर्नी यांना विचारण्यात आला आहे. आम्हाला निमंत्रण मिळालं, व्हिजा मिळाला आणि सुरक्षा देण्यात आली, तर आम्ही भारतामध्ये जायला तयार आहोत, असं उत्तर त्यांनी दिलं. ज्यापद्धतीने आम्ही २०११च्या वर्ल्ड कपमध्ये आणि २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतात गेलो होतो, तसंच २०२१ सालीही जाऊ, असं स्पष्टीकरण बर्नी यांनी दिलं आहे. डॉन न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये बर्नी यांनी हे वक्तव्य केलं आहे.



यावर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये आशिया कप होणार होता, पण भारताने पाकिस्तानमध्ये खेळायला नकार दिला. भारत जर पाकिस्तानमध्ये खेळत नसेल, तर आम्हीही २०२१ साली भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी प्रमुख वसीम खान म्हणाले होते. वसीम या वक्तव्यामुळे वाद वाढल्यानंतर वसीम खान यांनी पलटी मारली. माझ्या वक्तव्य चुकीच्या संदर्भाने दाखवण्यात आलं अशी सारवासारव वसीम खान यांनी केली.