`...तर आम्ही नुकसान भरपाईची मागणी करणार`; भारताचा उल्लेख करत पाकिस्तानचा ICC ला इशारा
जर भारताने राजकीय आणि सुरक्षेची कारणं सांगत पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (International Cricket Council) चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 चं आयोजन करण्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी करण्याची विनंती केली आहे. तसंच जर भारताने राजकीय आणि सुरक्षेची कारणं सांगत पाकिस्तानात येण्यास नकार दिला तर आम्ही आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. पीसीबीमधील एका अत्यंत विश्वासू सूत्राने पीटीआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप आयसीसीने या करारावर स्वाक्षरी केलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीसीबीचे अध्यक्ष झका अशरफ आणि सीओओ सलमान नसीर यांनी अहमदाबाद येथे आयसीसी कार्यकारी मंडळाची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी फेब्रुवारी-मार्च, 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्याबाबत चर्चा केली.
"पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यावेळी चर्चेत भारतीय संघ पुन्हा एकदा आमच्या देशात जाण्यास नकार देण्याची शक्यता बोलून दाखवली. तसंच आयसीसीने कोणत्याही परिस्थितीत या स्पर्धेसंबंधी एकतर्फी निर्णय घेणं टाळलं पाहिजे," असंही स्पष्ट केलं. जर भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला तर आंतरराष्ट्रीय परिषदेने स्वतंत्र सुरक्षा संस्थेची नेमणूक करावी असं पीसीबी अधिकाऱ्यांनी सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयसीसी भारतासह सहभागी संघांच्या सुरक्षेच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकते असंही त्यांनी सांगितलं. यावेळी पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात अनेक संघांनी सुरक्षेची चिंता न करता पाकिस्तानचा दौरा केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे की जर भारताने संघ पाठवण्यास नकार दिला आणि सामने दुसऱ्या देशात हलवण्यात आले तर आम्हाला नुकसान भरपाई दिली जावी.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध पाहता भारत राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेऊ शकतो अशी शक्यता पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या आशिया कपदरम्यानही भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. भारताने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले होते. पाकिस्तानात फक्त 4 सामने खेळवले गेले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, अशरफ आणि नसीर यांनी आयसीसीसह झालेल्या बैठकीत आपण यजमान हक्क सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी 2025 मध्ये भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्याबाबत कोणताही निर्णय केवळ त्यांचं सरकारच घेईल आणि ते या निर्णयाचे पालन करण्यास बांधील असतील असं सांगितलं आहे," अशी माहिती सूत्राने दिली आहे.