`एकदा जय शाह यांना ICC मध्ये जाऊ दे मग...`, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं चॅम्पिअन ट्रॉफीवर मोठं विधान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी जय शाह यांना आयसीसी हाताळताना होणाऱ्या फायद्यांचाही विचार करावा असा सल्ला दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसीन नखवी (Mohsin Naqvi) यांनी चॅम्पिअन्स ट्रॉफीचं (Champions Trophy) आयोजन करताना आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट ठेवावी असं सांगितलं आहे. तसंच पाकिस्तान भारतात खेळणं आणि ते येथे येणं शक्य नाही असंही ते म्हणाले आहेत. गद्दाफी स्टेडिअममध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मोहसीन नखवी यांनी आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे असं सांगितलं आहे.
"आम्ही जे पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वोत्तम आहे, ते करु असं आश्वासन देतो. मी सतत आयसीसी चेअरमनच्या संपर्कात असून, माझी टीम सतत त्यांच्याशी संवाद साधत आहे. आम्ही अजूनही आमच्या भूमिकेत स्पष्ट आहोत की आम्ही भारतात क्रिकेट खेळतो हे मान्य नाही आणि ते इथे क्रिकेट खेळत नाहीत. जे होईल ते समानतेच्या आधारावर होईल. आम्ही आयसीसीला अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे आणि पुढे काय होईल ते आम्ही तुम्हाला कळवू," असं मोहसीन नखवी यांनी सांगितलं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये तीन ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. परंतु 2008 पासून पाकिस्तानचा दौरा न केलेल्या भारताने आयसीसीला सरकारने त्यांना या महिन्याच्या सुरुवातीला या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिलेली नाही असं कळवलं आहे.
"आम्ही जे काही करु त्यातून पाकिस्तानसाठी सर्वोत्तमच काहीतरी होईल याची आम्ही खात्री करु," असं मोहसीन नखवी यांनी अनेकदा अधोरेखित करुन सांगितलं. "पण मी पुन्हा एकदा सांगतो की, पाकिस्तान भारतात खेळणं शक्य नाही आणि ते इथे येणार नाहीत," असंही ते म्हणाले.
नखवी पुढे म्हणाले की, आयसीसीच्या बैठकीत घेतलेला कोणताही निर्णय पीसीबी अंतिम मंजुरीसाठी पाकिस्तान सरकारकडे नेईल. त्यांनी बीसीसीआयचे सचिव म्हणून आपलं पद सोडणाऱ्या जय शाह यांना संस्थेची हाताळणी करताना आयसीसीच्या फायद्याचा विचार करावा असं सांगितलं आहे. जय शाह लवकरचआयसीसी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता आहे.
"जय शाह डिसेंबरमध्ये पदभार स्विकारणार आहेत. मला खात्री आहे की, ते कोणतंही कार्य करताना आयसीसीच्या फायद्याचा विचार करतील. जो कोणी या पदावर येईल त्याने फक्त संस्थेच्या भल्याचा विचार करायला हवा," असं ते म्हणाले आहेत.