मुंबई : बीसीसीआयने आशिया कपच्या आयोजनाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तानने आशिया कपच्या आयोजन करण्याबाबत आमचा काहीही आक्षेप नाही, पण भारतीय टीम पाकिस्तानचा दौरा करणार नाही, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. आशिया कप टी-२० स्पर्धा यावर्षी होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपआधी ही स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कपचं ठिकाण हे तटस्थ असलं पाहिजे. यावेळी पाकिस्तानमध्ये जाणं हा पर्याय नाही. भारतीय टीम पाकिस्तानचा दौरा करणार नाही. जर आशिया क्रिकेट परिषदेला भारताशिवाय ही स्पर्धा खेळवायची असेल, तर ते तसं करु शकतात. पण जर भारताला घेऊन स्पर्धेचं आयोजन करायचं असेल, तर मात्र ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होता कामा नये, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.


२०१८ सालचा आशिया कप भारतात होणं अपेक्षित होतं, पण पाकिस्तानी खेळाडूंच्या व्हिजाच्या समस्यांमुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली. '२०१८ सालच्या स्पर्धेचं आयोजन बीसीसीआयने केलं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डही असंच आयोजन करु शकतं. तटस्थ ठिकाण हा एक पर्याय असू शकतो. बीसीसीआयने २०१८ सालीही हेच केलं होतं', अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.


२००९ साली श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर १० वर्ष कोणतीही टीम पाकिस्तानला गेली नव्हती. अखेर २०१९ साली श्रीलंकेच्या टीमने पाकिस्तानचा दौरा केला होता. बांगलादेशची टीमही सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्येच या दोन्ही टीम एकमेकांविरुद्ध खेळतात.