Ishan Kishan: जे लोक शिव्या देतायत...; हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ काय म्हणाला इशान किशन?
Ishan Kishan On Hardik Pandya: वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.
Ishan Kishan On Hardik Pandya: नुकतंच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात हार्दिक पंड्याने खास गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली. या सामन्यात शेवटची ओव्हर टाकत टीम इंडियाला हार्दिकने विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने अंतिम सामन्यात 20 धावांत 3 विकेट्स घेतले. ज्यामध्ये धोकादायक फलंदाज हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या विकेट्सचा समावेश होता. अशातच आता टीम इंडियाचा युवा खेळाडू ईशान किशनने हार्दिकची बाजू घेतली आहे.
दरम्यान वर्ल्डकपपूर्वीचा काळ हार्दिक पांड्यासाठी सोपा नव्हता. हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, आता ईशान किशनने हार्दिक पांड्याबाबत आपलं मत व्यक्त केलंय. एका वृत्त संस्थेशी बोलताना ईशान किशन म्हणाला की, मला वाटतं होतं की, हार्दिक पांड्या त्याचे प्रयत्न वर्ल्ड कपसाठी वाचवून ठेवत होता. मी त्याचे शब्द कधीच विसरू शकत नाही. 'एकदा मी चांगली कामगिरी केली की आज जे लोक शिव्या देतायत तेच लोक टाळ्या वाजवतील.
ईशान पुढे म्हणाला की, जेव्हा मी खूप कठीण परिस्थितीतून जात होतो तेव्हा त्याने मला हेच सांगितलं, तो म्हणाले, 'लोकांना बोलू द्या, तुम्ही तुमच्या आवडीच्या खेळात सर्वोत्तम प्रयत्न करा आणि तुमचे 100 टक्के द्या.
हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला 16 रन्सची गरज होती. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर फलंदाजी करत होता. हार्दिक पंड्याच्या पहिल्याच बॉलवर सूर्यकुमार यादवने अप्रतिम कॅच घेत सामना भारताच्या बाजूने वळवला. परिणामी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेचा 7 रन्सने पराभव केला.
कृणाल पंड्यानेही केलं भाष्य
कृणालनं हार्दिकचं कौतुक करत लिहिलेल्या भावनिक पोस्टमध्ये म्हटलं, 'हार्दिक आणि मी व्यावसायिक स्तरावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात करून आता एक दशक लोटलं. गेले काही दिवस हे जणू एखाद्या परिकथेसारखे होते. जणू काही प्रत्येक देशवासीय हे क्षण जगत होता. माझा भाऊ या साऱ्याच्या केंद्रस्थानी होता हे पाऊन मला भावना दाटून आल्या. मागील 6 महिने त्याच्यासाठी अतिशय कठीण होते. त्याच्यासोबत जे काही घडलं ते त्याच्या वाट्याला यायला नाही पाहिजे होतं आणि भाऊ म्हणून मला त्याची खूप खंत वाटते.
कृणालने त्याच्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं आहे की, लोकांच्या हिणवण्यापासून त्याच्यावर होणाऱ्या अर्वाच्य टिकेपर्यंत सारंकाही घडलं. पण, तोसुद्धा एक माणूस आहे आणि त्यालाही भावना आहेत हेच आपण विसरलो. त्यानं या परिस्थितून हसऱ्या चेहऱ्यानं वाट काढली. पण हे सर्व किती कठीण होतं हे मला ठाऊक आहे. त्या क्षणापासून त्यानं प्रचंड मेहनत घेतली आणि विश्वचषकाच्या विजयासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. तेच त्याचं ध्येय्य होतं'.