लाइव्ह फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर पडली वीज, एकाचा मृत्यू तर पाच जखमी; थरकाप उडवणारा Video Viral
Peru Lightning Strike: फुटबॉल सामन्यादरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला आहे, ज्यामध्ये लाइव्ह सामन्यादरम्यान विजेच्या धक्क्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला तर इतर पाच खेळाडू जखमी झाले.
Lightning Strikes Football Player Mid-Match: पेरूमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला आहे. लाइव्ह सामन्यादरम्यान विजेच्या धक्क्याने एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे तर इतर पाच खेळाडू जखमी झाले आहेत. या दुर्दैवी अपघातात 39 वर्षीय फुटबॉलपटू जोस ह्यूगो डे ला क्रूझ मेझा याचा जागीच मृत्यू झाला. खेळ थांबल्यानंतर काही क्षणातच, फुटबॉलर जोस ह्यूगो डे याला विजेचा धक्का बसला, त्यानंतर तो जमिनीवर पडला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एवढंच नाही तर काही खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत. चिल्का येथे स्थानिक क्लब जुवेट बेलाविस्टा आणि फॅमिली चोका यांच्यातील सामन्यादरम्यान हा अपघात झाला.
नक्की काय झालं?
या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, खेळ थांबल्यानंतर खेळाडू डगआऊटच्या दिशेने जात असताना विजेचा कडकडाट झाला आणि अनेक खेळाडू एकाच वेळी अचानक खाली पडले. यावेळी काही खेळाडू उठण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
हे ही वाचा:IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील
घटनेचा व्हिडीओ व्हायरल
द मिररच्या वृत्तानुसार, या भयावह अपघातात गोलरक्षक जुआन चोका लैक्टाचाही समावेश होता आणि तो गंभीररीत्या भाजला. घटनास्थळी रुग्णवाहिका नसल्याने चोकाला टॅक्सीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याव्यतिरिक्त, इतर तीन खेळाडू - 24 वर्षीय क्रिस्टियन सेझर पिटुय काहुआना, एक 16 वर्षांचा आणि एक 19 वर्षांचा देखील जखमी झाला. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर सामना रद्द करण्यात आला. फुटबॉलच्या मैदानावर अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये अशीच एका घटना घडली, जिथे 35 वर्षीय सेप्टियन राहराजाचा सामन्यादरम्यान वीज पडून मृत्यू झाला होता.