VIRAL PHOTO: युझवेंद्र चहलने उस्मान खानला केलेल्या मदतीवर नेटकरी फिदा
अनेक गोष्टी या सामन्याच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आल्या. मग ती शरद पवार यांची उपस्थिती असो किंवा मग नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय असो...
मुंबई : भारत- पाकिस्तान या दोन्ही प्रतिस्पर्धी संघांमध्ये जेव्हा केव्हा एखादा सामना होतो तेव्हा अनेकजण त्याच सामन्याकडे लक्ष लावून राहिलेले असतात. मग तो सामना कोणताही असो. त्यातही क्रिकेटचा सामना असला की या दोन्ही संघातील खेळाडूंसोबतच क्रीडारसिकांमध्ये एक प्रकारचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. आशिया कपच्या निमित्ताने बुधवारी भारत आणि पाकिस्तान या संघांमध्ये झालेल्या सामन्यात असाच उत्साह पाहायला मिळाला होता. अनेक गोष्टी या सामन्याच्या निमित्ताने अधोरेखित करण्यात आल्या. मग ती शरद पवार यांची उपस्थिती असो किंवा मग नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघाने घेतलेला प्रथम फलंदाजीचा निर्णय असो. अशा या सामन्यात भारतीय संघाच्या वाट्याला आलेल्या यशाने तर अनेकांची मनं जिंकली. त्यासोबतच मनं जिंकली ती म्हणजे भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल याने.
असंख्य क्रीडारसिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात युजवेंद्रने ४३ व्या षटकात पाकिस्तानच्या उस्मान खान य़ा खेळाडूच्या शूजची लेस बांधल्याचं पाहायला मिळालं. हाच क्षण सोशल मीडियायवर अवघ्या काही सेकंदांमध्ये चर्चेचा विषय ठरला. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सोशल मीडिया युजर्सनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयी ट्विट करत युझवेंद्रच्या या कृतीची प्रशंसा केल्याचं पाहायला मिळालं. अनेकांनी तर हाच सामन्यातील सर्वात सुरेख क्षण असल्याचंही म्हटलं. तर काहींनी या क्षणाला दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या नात्याशी जोडत खेळाच्या माध्यमातून देशही जोडले जाऊ शकतात, आणि आम्हालाही याच गोष्टीने जोडून ठेवलं आहे, ही बाब अधोरेखित केली.
दरम्यान, मैदानावर असतेवेळी विरोधी संघातील खेळाडूसोबत स्पर्धात्मक आणि तितक्याच खिलाडू वृत्तीने पाहण्याचा खेळाडूंचा स्वभाव याआधीही अनेकदा पाहायला मिळाला आहे. पण, भारत- पाकिस्तान या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये असे प्रसंग घडले तर त्याची चर्चा होणारच असं म्हणणं वावगं ठरणार नाही.