AUS vs NAM Warm Up Match: टी-20 वर्ल्डकपला आता काही दिवसांतच सुरुवात होणार असून 1 जून रोजी या टूर्नामेंटमधील वॉर्म-अप सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी अशात एका वॉर्म-अप सामन्यादरम्यान एक वेगळं चित्र पहायला मिळालं आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी होणाऱ्या वॉर्म अप सामन्यात एका टीमचा चीफ सिलेक्टर आणि कोचिंग स्टाफ सामना खेळताना दिसले. या घटनेने सर्वांना आश्चर्य वाटलंच खरं. मात्र टीमने असा निर्णय का घेतला हे पाहूया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, टीमला हा निर्णय घेणं भाग पडलं. या टीमतील काही खेळाडू अजून वेस्ट इंडिजला पोहोचलेले नाहीत. अशा स्थितीत टीमकडे खेळाडूंची कमतरता होती. त्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागल्याचं समोर आलं आहे.


चीफ सेलेक्टर-कोचिंग स्टाफ खेळण्यासाठी उतरले मैदानात


त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि नामिबिया यांच्यात वॉर्म सामना खेळवला गेला. या सामन्यात चाहत्यांना एक धक्कादायक गोष्ट पाहयाला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या टीमचे 6 खेळाडू अजून वेस्ट इंडिजला पोहोचलेले नाहीत. अशा परिस्थितीत 9 ऑस्ट्रेलियन खेळाडू सराव सामन्यासाठी उपलब्ध होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाने या सामन्यात फिल्डींग करताना मुख्य निवडकर्ता आणि कोचिंग स्टाफची मदत घेतली.


या खेळाडूंना करावी लागली फिल्डींग


वर्ल्डकपपूर्वी झालेल्या या वॉर्म अप सामन्यात फक्त कर्णधार मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, जॉश इंग्लिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, ॲश्टन अगर, नॅथन एलिस, ॲडम झम्पा आणि जोश हेझलवूड हेच खेळाडू उपलब्ध होते. अशा स्थितीत टीमचे प्रमुख सिलेक्टर जॉर्ज बेली यांना पर्यायी फिल्डरच्या निमित्ताने मैदानात उतरावं लागले. याशिवाय कोचिंग स्टाफ सदस्य अँद्रे बोरोवेक, अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि ब्रॅड हॉज हे देखील मैदानात उतरले. पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, मार्कस स्टॉइनिस, मिचेल स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीन यांना आयपीएल 2024 मुळे काही दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांनंतर हे खेळाडू टीमशी जोडले जाणार आहेत.


ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने जिंकला सामना


या वॉर्म-अप सामन्यात ऑस्ट्रेलियन टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावून केवळ 119 रन्स केले होते. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 10 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पार केलं. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने केवळ 2 विकेट गमावल्या.