चेन्नई : कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे जगातली सगळ्यात मोठी टी-२० लीग असलेल्या आयपीएलवरही संकट ओढावलं आहे. कोरोनामुळे केंद्र सरकारने बीसीसीआयला आयपीएलसाठी परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जी एलेक्स बेन्झिगर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती एमएम सुन्द्रेश आणि कृष्णन रामास्वामी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर १२ मार्चला सुनावणी होण्याची शक्यता आहे.


'अजूनपर्यंत कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून कोणतंही औषध नसल्याचं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे. कोरोना व्हायरस जगभरात जलद गतीने पसरत आहे. इटली फेडरेशन लीग या फूटबॉल स्पर्धेच्या मॅचही प्रेक्षकांशिवाय होत आहेत,' असं याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हणलं आहे.


दुसरीकडे आयपीएल सामने पाहण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून आयपीएल सामन्यांच्या तिकिटांची विक्री करू नये, अशी भूमिका महाराष्ट्र सरकार घेणार असल्याचं कळतंय. त्यामुळे महाराष्ट्रात यंदा आयपीएलचे सामन्यांना परवानगी दिली, तरी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश न मिळण्याची शक्यता आहे.


कर्नाटक सरकारनेही कोरोनाच्या धोक्यामुळे आयपीएलची स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलावी, अशा मागणीचं पत्र केंद्र सरकारला दिलं आहे.


आयपीएलचं अर्थकारण बघता स्टेडियममधल्या प्रेक्षकांपेक्षा घरात टीव्हीवर आयपीएल बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसंच टीव्हीवरच्या जाहिरातींमुळे आयपीएलला सर्वाधिक महसूल मिळतो, त्यामुळे आयपीएलचे सगळे सामने प्रेक्षकांशिवाय होऊ शकतात.