PM Modi spoke to Sarabjot Singh : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने मनू भाकरसोबत कांस्यपदकाला गवासणी घातली. त्यामुळे सध्या सरबज्योत सिंगचं देशभरातून कौतूक होताना दिसतंय. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदक विजेता सरबज्योत सिंग यांच्याशी बोलून पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केलं.


मोदी नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरबज्योत तुझं खूप खूप अभिनंदन. तू देशाची मान अभिमानाने उंचावली आहेस. अखेर तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळालं. मनूचे माझ्याकडून अभिनंदन. वैयक्तिक स्पर्धेत तू खूप जवळ होतास, पण सांघिक स्पर्धेत तू गौरव केलास. खरोखर चांगली कामगिरी केली, असं नरेंद्र मोदी फोनवर सरबज्योतला म्हणाले. त्यावेळी त्यांनी सरबज्योतला मनूसोबतच्या टीमवर्कचं सिक्रेट देखील विचारलं. त्यावर सरबज्योतने खुलासा केला.


आम्ही खूप आधीपासून एकत्र खेळतोय. 2019 पासून आम्ही राष्ट्रीय, ज्युनियर विश्वचषक आणि इतर विश्वचषकांमध्ये एकत्र खेळत आहोत, आम्हाला आशा आहे की आम्ही पुढच्या वेळी सुवर्णपदक जिंकू, असा विश्वास सरबज्योतने मोदींसोबत बोलताना व्यक्त केला. त्यावर मोदींनी दोघांना शाबासकी दिली. मला तुमच्यावर विश्वास आहे, अशीच मेहनत घेत रहा, असं म्हणत मोदींनी मनोभावना उंचावली. 



अंतिम फेरीत, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी वोंहो ली आणि ये जिन ओह यांचा 16-10 असा पराभव केला अन् कांस्य पदकावर नाव कोरलं. मनू भाकरने मिश्रमध्ये देखील पदक जिंकून इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. तर सरबज्योत सिंगने पहिलंच ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे.


दरम्यान, टोकियो ऑलिम्पिक ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल्स जिंकण्यापर्यंतचा मनू भाकरचा प्रवास सोपा नव्हता. खरं तर टोकियो ऑलिम्पिकमध्येच मनू भाकरकडून सर्वांना मेडल्सची अपेक्षा होती.. मात्र मनूकडून साफ निराशा झाली. पिस्तूलने साथ न दिल्याने मनू भाकरच्या हाती अपयश आलं. टोकियोत पदक हुकल्यावर मनू शूटिंग सोडणार होती. ती या काळात नैराश्येतूनही गेली.. मात्र त्यावरही मनू भाकरने जिद्दीने मात केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन मेडल्सची कमाई केली. 25 मीटर एअर पिस्टल हा मनू भाकरचा आवडता प्रकार आहे. तेव्हा मनू भाकरला पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिसरं मेडलही जिंकण्याची संधी आहे.