बंगळुरू : भारत आणि अफगाणिस्तानमधल्या ऐतिहासिक टेस्टला सुरुवात झाली आहे. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ही मॅच खेळवण्यात येत आहे. अफगाणिस्तानची ही पहिलीच टेस्ट मॅच आहे. टेस्ट मॅच खेळणारा अफगाणिस्तान हा 12वा देश ठरला आहे. अफगाणिस्तानसाठी असलेल्या या ऐतिहासिक दिवसानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे. अफगाणिस्तानची टीम त्यांची पहिली टेस्ट मॅच खेळत आहे त्यामुळे अफगाणिस्तानच्या नागरिकांना शुभेच्छा. ही ऐतिहासिक मॅच खेळण्यासाठी त्यांनी भारताची निवड केल्यामुळे मी आनंदी आहे. दोन्ही टीमना शुभेच्छा. खेळामुळे दोन्ही देशाचे नागरिक जवळ येतील आणि संबंध सुधारतील, अशी आशा मी व्यक्त करतो, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.



पहिल्या दिवसाचा खेळ संपला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये अफगाणिस्ताननं कमबॅक केलं आहे. भारताचे ओपनर शिखर धवन, मुरली विजय यांचं शतक आणि तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या लोकेश राहुलनं अर्धशतक झळकवून भारताला मजबूत सुरवात करून दिली. पण यानंतर आलेल्या बॅट्समनना चमकदार कामगिरी करता आली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 347/6 एवढा आहे. शिखर धवननं 96 बॉलमध्ये 107 रनची खेळी केली. यामध्ये 3 सिक्स आणि 19 फोरचा समावेश होता. तर मुरली विजयनं 153 बॉलमध्ये 105 रन केल्या. विजयनं 15 फोर आणि 1 सिक्स मारली. लोकेश राहुलनं 64 बॉलमध्ये 54 रन केले. अफगाणिस्तानच्या यामीन अहमदझईनं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर वफादार, राशीद खान आणि मुजीब उर रहमानला प्रत्येकी एक विकेट मिळाली.


भारताच्या पहिल्या तिन्ही बॅट्समननी रन केल्यानंतर चेतेश्वर पुजारा 35, अजिंक्य रहाणे 10, दिनेश कार्तिक 4 रनवर आऊट झाले. दिवसाअखेरीस हार्दिक पांड्या 10 रनवर आणि अश्विन 7 रनवर नाबाद खेळत आहेत.


हे रेकॉर्ड करणारा धवन पहिला भारतीय


टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंगच्या पहिल्या सत्रात शतक करणारा धवन हा सहावा बॅट्समन तर पहिला भारतीय आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचे माजी विकेट कीपर ट्रंपर, चार्ली मॅकार्टनी, डॉन ब्रॅडमन, डेव्हिड वॉर्नर आणि पाकिस्तानच्या माजीद खाननं हे रेकॉर्ड बनवलं होतं.


धवनच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड


याचबरोबर शिखर धवनच्या नावावर आणखी एका रेकॉर्डची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानची टेस्ट क्रिकेटमधली शिखर धवन ही पहिली विकेट ठरला आहे. अफगाणिस्तानचा फास्ट बॉलर यामीन अहमदझईच्या बॉलिंगवर मोहम्मद नबीनं स्लिपमध्ये धवनचा कॅच पकडला.


शिखर धवननं आत्तापर्यंत 30 मॅचच्या 50 इनिंगमध्ये 43.84 च्या सरासरीनं 2,153 रन केल्या आहेत. यामध्ये 7 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.