मुंबई : १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉनं आपल्या फलंदाजीनं विश्वचषकात आपली वेगळी छाप सोडलीच. शिवाय त्याच्यामध्ये असलेल्या नेतृत्वगुणामुळेही पृथ्वीनं साऱ्यांचंच लक्ष वेधलंय. युवा संघाच्या या संघनायकाचंही कौतुक कराव तेवढ थोडं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉनं वयाच्या १५ व्या वर्षीच आपली दखल संपूर्ण क्रिकेट जगताला घ्यायला भाग पाडल होतं. हॅरिस शिल्डमध्ये ५४६ धावांची स्फोटक खेळी खेळत त्यानं आपण उद्याचे चॅम्पियन्स असल्याचं सिद्ध केलं होतं. शालेय क्रिकेटमध्ये ५०० रन्सची खेळी खेळणाऱ्या या मुंबईकर क्रिकेटपटूकडे तेव्हापासून 'लंबी रेस का घोडा' असल्याचं पाहिलं जातं होतं. आणि आता तर त्यानं आपल्या फलंदाजीच्या आणि नेतृत्वाच्या जोरावर भारतीय संघाला १९ वर्षाखालील विश्वचषकाचं अजिंक्यपद पटकावन दिलं.


पृथ्वीनं या विश्वचषकात क्रिकेप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा एक कव्हर ड्राईव्ह मारला होता. त्यानंतर त्याची तुलाना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केली जाऊ लागलीय. पृथ्वी शॉनं या विश्वचषकातील ६ सामन्यांमध्ये ६५.२५ च्या सरासरीनं २६१ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली ९४ धावांची खेळी या विश्वचषकातील त्याची सर्वोत्तम इनिंग ठरलीय.



पृथ्वी शॉनं आपल्या खेळानं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. त्याचप्रमाणे शालेय क्रिकेटपासूनच त्यानं क्रिकेटचं मैदान गाजवायला सुरुवात केली होती.


पृथ्वी शॉनं हॅरिस शिल्ड टुर्नामेंटमध्ये रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना ५४६ रन्सची मॅरेथॉन खेळी खेळली होती. या खेळीत त्यानं ८५ चौकार आणि ५ षटकार लगावले होते. शालेय क्रिकेटमध्ये ५०० धावा करणारा तो एकमेव क्रिकेटर बनला होता. पाच वर्षानंतर त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये आणखी एका रेकॉर्ड मोडित काढला. त्यानं आपल्या दुलीप ट्रॉफीची पहिल्याच लढतीत शतक झळकावलं होतं. दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या लढतीत शतकक झळकावणार तो सचिन तेंडुलकरनंतर दुसरा क्रिकेटपटू आहे. यानंतर रणजी ट्रॉफीतही त्यानं याचीच पुनरावृत्ती केली. रणजीतही सचिननंतर पदार्पणात शतक ठोकणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.  


आपल्या खेळानं पृथ्वीनं शालेय, रणजी आणि आता १९ वर्षाखालील विश्वचषकात एकामागून एक विक्रमांना गवसणी घातलीय. आता या मुंबईकर क्रिकेटपटूनं लवकरच भारताच्या सिनियर संघात स्थान पटकावलं तर काही आश्चर्य वाटायला नको....