Prithvi Shaw Distracted Due To This Says Childhood Coach: भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील सर्वात मोठा खेळाडू असा गवगवा झालेल्या पृथ्वी शॉला यंदा इंडियन प्रिमिअर लिग 2025 च्या पर्वासाठी झालेल्या लिलावामध्ये कोणीच विकत घेतलं नाही. पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिल्याने तो आता चर्चेत आला आहे. करिअरच्या पहिल्याच कसोटीत दमदार शतक झळकावणारा पृथ्वीची कामगिरी दिवसोंदिवस खालावत गेली आणि तो संघाबाहेर फेकला गेला. 2018 साली 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या या खेळाडूने वयाच्या 19 व्या वर्षी कसोटीत पदार्पणात शतक झळकावलं होतं. मात्र आता त्याला कोणीच वाली नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र पृथ्वीची ही अवस्था नेमकी कशामुळे झाली? अतिआत्मविश्वास? पैसा? खेळावर लक्ष नसणं? यासारख्या कारणांपेक्षा त्याला लहानपणापासून क्रिकेटचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकांना एक वेगळं कारण यामागे वाटत आहे.


कोण आहेत हे प्रशिक्षक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीचे बालपणीचे प्रशिक्षक, संतोष पिंगुळकर यांनी पृथ्वीच्या करिअरची पडझड का झाली याबद्दल भाष्य केलं आहे. आर्थिक घटकांपेक्षा अन्य एक घटक फार महत्त्वाचा ठरल्याचं पिंगुळकर यांनी म्हटलं आहे. वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी क्रिकेटमधील करिअरला पृथ्वीने पिंगुळकर यांच्या प्रशिक्षणाअंतर्गतच सुरुवात केली होती. जवळपास दशकभर पिंगुळकर यांनी पृथ्वीला ट्रेनिंग दिलं. त्यांनीच आता पृथ्वीबद्दल भाष्य केलं आहे.


त्याच्या वडिलांनी फार त्याग केलाय


"तू सुरुवातीपासूनच इतरांपेक्षा वेगळा होता. त्याचे आई किंवा वडील कोणीही क्रिकेटपटू नव्हते. मात्र पृथ्वी हा गॉड गिफ्टेड आहे. त्याची खेळण्याची शैली खास आहे. मग ती बचावात्मक असो किंवा आक्रमक असो तो फार वेघला आहे. त्याचा मैत्रीपूर्ण स्वभाव हा त्याला इतरांपेक्षा वेगळं करायचा," असं पिंगुळकर यांनी 'माय खेल'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं. "तो वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत माझ्यासोबत होता. त्यानंतर तो मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी खेळू लागल्यानंतरही मीच त्याला प्रशिक्षण देत होतो. तो आठवड्यातून दोनदा सरावासाठी यायचा. तो चार वर्षांचा असतानाच त्याची आई वारली. त्याच्या वडिलांनीच त्याची काळजी घेतली. ते त्याला सरावाला घेऊन यायचे. ते त्याचं किट घेऊन यायचे. अगदी विरार ते मुंबई असा प्रवास ते पृथ्वीबरोबर करायचे. त्यांनी पृथ्वी यशस्वी क्रिकेटपटू व्हावा म्हणून फार त्याग केला," असं पिंगुळकर यांनी सांगितलं.


या एका गोष्टीमुळे झाली घसरण


पिंगुळकर यांच्या सांगण्यानुसार आर्थिक घटकापेक्षा पृथ्वीच्या मित्र परिवार बदलल्याने त्याच्या सर्वच गोष्टींवर परिणाम झाला. "पृथ्वीच्या कामगिरीमध्ये घसरण होण्यासाठी त्याला मिळालेली प्रसिद्धीने फार महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचा मित्र परिवार बदलला. तो क्रिकेटच्या विश्वासापासून दूर गेला आणि फिल्मी जगामध्ये रमला. त्याचे मित्रमैत्रिणी हे क्रिकेटची पार्श्वभूमी असलेले नाहीत. त्यांनी त्याला पुन्हा क्रिकेटवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी मदत केली नाही. त्याचं खेळावरील प्रेम कमी झालेलं नाही. मात्र त्याचा वेळ आणि लक्ष्य बदललं. दुखापत आणि बंदीमुळे तो क्रिकेटपासून अजून दूर झाला. त्याच्यावर यंदाच्या आयपीएलसाठी कोणीच बोली लावली नाही याचं मला आश्चर्य वाटलं नाही. त्याने त्याची बेस प्राइज 75 लाखांपर्यंत कमी केली होती. मात्र त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि तो निवडला गेला नाही," असं पिंगुळकर म्हणाले.