मुंबई : ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारतानं अंडर १९ वर्ल्ड कपवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं. पृथ्वी शॉच्या नेतृत्वामध्ये यंदाच्या स्पर्धेतली एकही मॅच भारतानं गमावली नाही. पृथ्वी शॉनं वर्ल्ड कपमध्ये २६१ रन्स, मनजोत कालरानं २५२ रन्स, शुभमन गिलनं ३७२ रन्स केले. तर अनुकूल रॉयनं १४ विकेट्स, कमलेश नागरकोटीनं ९ विकेट्स घेतल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये शतक झळकावणाऱ्या मनजोत कालराला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं. तर पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये शतक करणाऱ्या शुभमन गिलला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं. पाकिस्तानविरुद्धच्या शतकाबरोबरच शुभमननं संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.


भारताच्या अंडर १९ वर्ल्ड कपचा कॅप्टन पृथ्वी शॉ असला तरी आयसीसीनं जाहीर केलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप टीमचं नेतृत्व पृथ्वी शॉला देण्यात आलेलं नाही. वेस्ट इंडिजचे माजी फास्ट बॉलर इयन बिशप, भारताची माजी महिला कॅप्टन अंजुम चोप्रा, न्यूझीलंडचा माजी कॅप्टन जेफ क्रो, ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर टॉम मूडी आणि पत्रकार शशांक किशोर यांनी या टीमची निवड केली आहे.


पृथ्वी शॉ, शुभमन गिल, मनजोत कालरा, अनुकूल रॉय आणि कमलेश नागरकोटी या पाच जणांचा आयसीसीच्या अंडर १९ टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पण दक्षिण आफ्रिकेच्या रेनार्डवॉन टोंडरकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.


आयसीसी अंडर १९ वर्ल्ड कप टीम


पृथ्वी शॉ, मनजोत कालरा, शुभमन गील, फिन ऍलन(न्यूझीलंड), रेनार्डवॉन टोंडर(कॅप्टन, दक्षिण आफ्रिका), वॅण्डिल माकवेतू(दक्षिण आफ्रिका, विकेट कीपर), अनुकूल रॉय, कमलेश नागरकोटी, गेराल्ड कोएटजी(दक्षिण आफ्रिका), कैस अहमद(अफगाणिस्तान), शाहीन आफ्रिदी(पाकिस्तान), एलिक अथांजे(वेस्ट इंडिज, बारावा खेळाडू)