प्रो कबड्डीचा क्रिकेटला `दे धक्का`
विवो प्रो कबड्डी लीगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललीये. कबड्डीचा पाचवा सीझन सुरु आहे. कबड्डीच्या पाचव्या सीझनने क्रिकेटलाही जोरदार धक्का दिलाय.
नवी दिल्ली : विवो प्रो कबड्डी लीगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललीये. कबड्डीच्या सध्या सुरू असलेल्या पाचव्या सीझनने क्रिकेटलाही जोरदार धक्का दिलाय.
भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नव्हे तर धर्म मानला जातो. देशात असे एकही ठिकाण नाही जिथे क्रिकेट पाहिले जात नाही. मात्र, कबड्डीच्या पाचव्या सीझनने
टीआरपीमध्ये क्रिकेटला चक्क मागे टाकलेय.
टीआरपीमध्ये क्रिकेटपेक्षा प्रो कबड्डी लीगचे सामने सर्वाधिक पाहिले गेलेत. भारत-श्रीलंका यांच्यातील सामने पाहणाऱ्यांच्या तुलनेत कबड्डीचे सामने पाहणारा प्रेक्षकवर्ग वाढलाय. नुकतीच बार्कने टीआरपी रेटिंग जाहीर केली.
या रेटिंगनुसार ३२व्या आठवड्यात तब्बल ३१.६ कोटी प्रेक्षकांनी स्टार्स स्पोर्ट्स फर्स्ट(इंग्रजी) आणि स्टार स्पोर्ट्स (हिंदी) या चॅनेलवरील कबड्डीचे सामने पाहिले. इंग्रजी भाषेतील चॅनेलवरुन तब्बल २०.६ कोटी प्रेक्षकांनी तर हिंदी चॅनेलवरुन १०.९ कोटी लोकांनी सामने पाहिले.
तर दुसरीकडे भारत-श्रीलंका यांच्यातील सामने पाहणाऱ्यांची संख्या ७.९ कोटी इतकी होती. तसेच भारतात सर्वाधिक पसंती दिल्या जाणाऱ्या पहिल्या पाच कार्यक्रमांमध्ये क्रिकेटचा समावेशही नाहीये.