PKL 11: कर्णधार सुनिल कुमारचा भक्कम बचाव आणि त्याला मिळालेली चढाईपटूंची चोख साथ याच्या जोरावर यु मुम्बाने प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वातील मंगळवारी झालेल्या ३६व्या सामन्यात दबंग दिल्लीवर ३२-२६ असा विजय मिळविला. दबंग दिल्लीकडून आशु मलिक आणि बचावपटू योगेशचे प्रयत्न अपुरे पडले. यु मुम्बाने या विजयाने हंगामातील पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीकडून झालेल्या पराभवाची परतफेड केली. पहिल्या सामन्यात दिल्लीने यु मुम्बावर सहा गुणांनी विजय मिळविला होता. मात्र, या वेळी यु मुम्बाच्या सर्वोत्तम सांघिक खेळापुढे त्यांची कामगिरी फिकी पडली. दिल्लीचा हा हंगामातील सातव्या सामन्यातील सलग चौथा पराभव ठरला, तर यु मुम्बा संघाने अखेरच्या सामन्यातून विजयाच्या मार्गावर आलेली गाडी रुळावर कायम राखली. पूर्वार्धात दोन्ही संघांनी सावध खेळावर भर दिल्यामुळे खेळ संथ झाला होता. उत्तरार्धात मात्र यु मुम्बाने सामन्याला वेग दिला. उत्तरार्धाच्या पाचव्याच मिनिटाला लोण देण्याची संधी साधत यु मुम्बाने आघाडी वाढवली आणि ती कायम टिकवून ठेवकत एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तरार्धात यु मु्म्बाने सुरुवातीलाच दिलेल्या लोणनंतर सामन्याला वेग दिला होता. मात्र, त्यानंतर मैदानावर आलेल्या दिल्लीचा कर्णधार आशु मलिकने आपल्या खोलवर आणि वेगवान चढायांनी मुम्बाच्या बचावफळीला आव्हान दिले. यातही आशु आणि सुनिल कुमार यांच्यातील स्पर्धा चांगलीच लक्षात राहिली. सुनिलने तीनवेळा आशुची पकड केली. पण, त्यानंतरही आशुच्या चौफेर चढायांनी दिल्लीच्या आव्हानातील हवा राखली होती. अशा वेळी यु मुम्बाने राखीव खेळाडू म्हणून रोहित यादवला उतरविण्याची केलेली चाल चांगलीच यशस्वी ठरली. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने यु मुम्बाने खेळावरील नियंत्रण कायम राखले. रोहितने एक गडी बाद करताना दोन बोनस गुण आणि दोन पकडी करताना महत्वपूर्ण पाच गुणांची कमाई केली. मुम्बासाठी हे पाच गुण खूप महत्वाचे ठरले. त्यामुळे सुनिलच्या बचावाला आणि मनजीतच्या चढायांना अचूक साथ मिळाली आणि मुम्बाचा विजय साकार झाला. 


हे ही वाचा: लाइव्ह फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर पडली वीज, एकाचा मृत्यू तर पाच जखमी; थरकाप उडवणारा Video Viral



त्यापूर्वी उत्तरार्धात दोन्ही संघातील खेळाडूंनी एकमेकांमधील आधीच्या सामन्यातील अनुभव लक्षात घेत सावध पवित्रा घेतला. खेळ संथ झाला. पण प्रतिस्पर्धी बचावपटू सुनिल कुमार आणि योगेश यांनी मुम्बा आणि दिल्लीच्या गुणांची जबाबदारी घेतली. दिल्लीसाठी सुरुवातील आशु मलिकने पहिले चार गुण चढाईतून मिळविले. मात्र, त्यानंतर पूर्वार्धातील १० मिनिटे त्याला बाहेर बसावे लागल्यामुळे दिल्लीच्या कामगिरीवर परिणाम झाला. मुम्बाच्या मनजीत आणि झाफरदानेश यांनी आपल्या चढाया चोख बजावून मुम्बाची गुणसंख्या वाढवण्याचे काम केले. 


हे ही वाचा: IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील


संपूर्ण सामन्यात पूर्वार्धात मुम्बाने चढाईत ७ आणि बचावात ६ गुणांची कमाई केली होती.दिल्लीने अनुक्रमे ५ आणि ८ गुण मिळवले. उत्तरार्धात मुम्बाने दोन्ही आघाड्यांवर प्रत्येकी ८ गुण मिळविले. दिल्लीला उत्तरार्धात पुन्हा एकदा आशुच्या चढायांनी गुण वसूल करण्याची संधी दिली. त्यांनी ९ गुण मिळवले. मात्र, उत्तरार्धात त्यांचा बचाव फिका पडला त्यांना तीनच गुणांची कमाई करता आली. पराभवातही आशु मलिकने ११ गुणांची, तर योगेशने ६ गुणांची कमाई केली. पण, त्यांना या वेळी नविन कुमारची उणिव पूर्णपणे भासली. त्यांना कुणाचीच साथ मिळाली नाही. मुम्बाकडून मनजीतने ९, सुनिल कुमारने ४, झाफरदानेशने ५ गुणांची कमाई केली.