Pro Kabaddi League: तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची आगेकूच, मिळवला दमदार विजय
Tamil Thalaivas PKL 11: गतविजेत्या पुणेरी पलटणची प्रो-कबड्डी लीगच्या नव्या पर्वातील आगेकूच बुधवारी तमिळ थलैवाजने रोखली. गच्ची बोवली क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या लीगमध्ये थलैवाजने पलटणचा ३५-३० असा पराभव केला.
Puneri Paltan vs Tamil Thalaivas: नव्या हंगामातील या अकराव्या सामन्यात थलैवाजच्या चढाईपटूंनी केलेला खेळ निर्णायक ठरला. नरेंदर कंडोला (९) आणि सचिन (८) यांच्या खोलवर चढायांना नितेशच्या भक्कम बचावाची साथ मिळाली. नितेशने हाय फाईव्ह करताना विजयात आपला वाटा उचलला. पुणेरी पलटणकडून मोहित गोयतच्या चढाया आकर्षक ठरल्या. पण, या वेळी त्याला सहकाऱ्यांकडून साथ मिळाली नाही. मोहितने १३ गुणांची कमाई केली. बचावात पलटणने पाच अव्वल पकडी करताना सामन्यात राहण्याच्या आशा उंचावल्या होत्या. पलटणच्या बचावाची धुरा या सामन्यात मध्यरक्षक अबिनेश नंदराजनने सांभाळली. त्याने चार गुण मिळवले. मात्र, आक्रमक पकड करण्याच्या नादात त्याला ग्रीन कार्डचाही सामना करावा लागला. दोन्ही सत्रात स्विकाराव्या लागलेल्या एकेक लोणमुळे त्यांना सामन्यात मागेच रहावे लागले. गतविजेत्या पुणेरी पलटणची प्रो-कबड्डी लीगच्या नव्या पर्वातील आगेकूच बुधवारी तमिळ थलैवाजने रोखली. गच्ची बोवली क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या लीगमध्ये थलैवाजने पलटणचा ३५-३० असा पराभव केला.
पलटणच्या कोपरारक्षकांचा केलेला घरचा अभ्यास थलैवाजच्या कल्पक नियोजनाची साक्ष देणारा ठरला. आधीच्या दोन्ही सामन्यात पलटणच्या गोरव खत्री आणि अमन या कोपरारक्षकांचा खेळ निर्णायक ठरला होता. मात्र, या वेळी नरेंदरने आपल्या कौशल्यपूर्ण चढाईने या दोघांनाही बाद केले. यामुळे दडपणाखाली गेलेल्या पलटण संघाला सामन्यात परत येण्यास उशिर झाला. त्याचबरोबर प्रशिक्षक धर्माराज चेर्लाथनच्या अनुभवाचा फायदा थलैवाजला मिळाला. मोक्याच्या वेळी चेर्लाथनने सामन्याचा वेग कमी करताना पाच खेळाडूंमध्येच खेळण्यास पसंती दिली. त्यामुळे पलटणचे प्रमुख चढाईपटू बोनस गुणांपासून वंचित राहिले.
एकवेळ पलटणने १०-१० अशी बरोबरी साधली होती. पण, त्याचवेळी त्यांना लोण स्विकारावा लागल्याने पलटणची बाजू कमकुवत झाली. पलटणने तिसऱ्या चढाईवर खेळण्याचे धोरण अवलंबले आणि भक्कम बचावाच्या जोरावर सचिन आणि नरेंदरच्या अव्वल पकडी देखिल केल्या. अर्थात, त्याचा थलैवाजच्या आघाडीवर फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर उत्तरार्धातही सामना संथ केल्यानंतरही नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घेत थलैवाजने विजयावर शिक्कामोर्तब केले.