Pro Kabaddi League: संघर्षपूर्ण लढतीत पुणेरी पलटणचा विजय गुजरात जाएंटसवर एका गुणाने केली मात!
Puneri Paltan VS Gujarat Giants: या विजयाने पुणेरी पलटण संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर उडी मारली. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याची अखेर विजयाने करत आपल्या घरच्या मैदानावर ताठ मानेने कूच केले.
PKL 11: अखेरच्या सेकंदाला उजवा कोपरारक्षक दादासाहेब पुजारीने गुजरात जाएंटसचा हुकम एक्का ठरलेल्या गुमानसिंगची पकड करुन पुणेरी पलटण संघाला प्रो कबड्डी लीगमध्ये गुजरात जाएंटसवर ३४-३३ असा एका गुणाने विजयी केले. या विजयाने पुणेरी पलटण संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर उडी मारली. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्याची अखेर विजयाने करत आपल्या घरच्या मैदानावर ताठ मानेने कूच केली.
संघर्षपूर्ण लढत
अपयशाच्या गर्तेत अडकलेल्या पुणेरी पलटणला आज कर्णधार आकाश शिंदेच्या १२ गुणांच्या कमाईने सावरले असले, तरी त्यांचा खरा विजय व्ही. अजित कुमार, दादासाहेब पुजारी आणि आर्यवर्धन नवले या राखीव खेळाडूंच्या कामगिरीने साकार झाला. अगदी मोक्याच्या क्षणी या राखीव खेळाडूंनी गुणांची कमाई करुन गुण स्थिती कधी बरोबरीत, तर कधी एका गुणाच्या पिछाडीवर राखली होती. राखीव खेळाडू येऊनही दादासाहेब पुजारीने बचावात चार गुणांची कमाई केली. अजितने ३, तर नवलेने दोन गुणांची कमाई केली. गुजरात संघाला १४व्या सामन्यात कुठेतरी पाचव्या विजयाच्या आशेचा किरण दिसत होता. पण, तो देखिल पलटणच्या राखीव खेळाडूंच्या कामगिरीने पुसला गेला. गुजरातकडून एकट्या गुमान सिंगने गुणांचा धडाका लावत सोळा गुणांची कमाई केली. पण, पराभवाने त्याच्या हंगामातील १०० आणि लीगच्या इतिहासातील ५०० गुणांचा टप्पा गाठल्याचा आनंद फिका पडला.
हे ही वाचा: WWE मध्ये एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? ग्रेट खलीने केला खुलासा
कसा झाला मध्यंतर
मध्यंतराला सामना बरोबरीत सुटला तेव्हा गुजरातच्या संघात एकच खेळाडू राहिल्याने उत्तरार्धाची सुरवात अपेक्षित लोणने झाली. या लोणनंतर पलटणने खेळावर चांगले नियंत्रण राखण्याची संधी गमावली. सुरुवातीला आघाडी पाच गुणांपर्यंत वाढवल्यावर बचावपटूंच्या चुकीने प्रथम त्यांना २२-२२ अशा बरोबरीवर यावे लागले. त्यानंतर प्रतिक हदियाने गुजरातला आघाडीवर नेले. नंतर पलटणच्या अबिनेशने अव्वल पकड करत पलटणला पुन्हा २५-२३ असे आघाडीवर नेले. पण, नंतर गुमानची अव्वल पकड अबिनेशकडून चुकली. तेव्हा त्याने दादासाहेब पुजारीलाही टिपत २५-२५ अशी आघाडी घेतली आणि चढाईत आकाशची पकड करत लोण परतवत २८-२६ असे गुजरातला आघाडीवर नेले. या लोणनंतर कमी अधिक प्रमाणात नियंत्रित खेल करत पलटणने चार मिनिटे राहिली असताना ३२-३० अशी आघाडी राखली होती. या वेळी प्रतिक दहिया डू और डाय चढाईत अडकला. आशाच परिस्थितीत आर्यवर्धन नवलेने पलटणला ३२-३२ असे बरोबरीत आणले. एक मिनिट राहिला असताना गुणस्थिती गुजरातच्या बाजने ३३-३२ अशी होती. अजितने चढाईत गुण वसूल करत ३३-३३ अशी बरोबरी साधली. अगदी अखेरच्या क्षणाला डू और डाय चढाईत गुमानसिंगची पकड करत दादासाहेब पुजारीने पलटणला एका गुणाने विजयी केले.
हे ही वाचा: लिलावात अनसोल्ड राहणं जिव्हारी लागलं, 'या' भारतीय खेळाडूने घेतला मोठा निर्णय; क्रिकेट विश्वात खळबळ
हे ही वाचा: Photos: यशस्वी जयस्वालचं मुंबईतील 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे आलिशान युरोप-इन्स्पायर घर बघितलं का?
दोन्ही संघाकडून बरोबरीचा सामना
त्यापूर्वी, आकाश शिंदे या नव्या कर्णधारपदाच्या खाली उतरलेल्या पुणेरी पलटण संघाने सुरुवातीच्या अपयशानंतर खेळ उंचावत मध्यंतराला १६-१६ अशी बरोबरी राखली होती. गुजरात जाएंटस गुमानसिंगच्या एकाहाती खेळाने आपले आव्हान राखून होते. त्याला बचावात हिमांशुची साथ मिळत होती. दुसरीकडे पलटणकडून कर्णधार आकाश शिंदेने आपल्या सहकाऱ्यांना प्रेरित केले. त्याला चढाईत मोहित गोयतची साथ मिळत होती. बचावात प्रत्येकाने आपला वाटा उचलला होता. विशेष म्हणजे दोन्ही संघांत चढायांच्या गुणांतही ११-११ अशी बरोबरी होती.