`...तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही`; कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा
Wrestlers Back To Job Talks About Protest: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले कुस्तीपटू सोमवारी आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले. त्यांच्या या निर्णयामुळे आता आंदोलनासंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
Wrestlers Back To Job Talks About Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात 23 एप्रिलपासून अनेक कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन (wrestlers protest) करत आहेत. यापैकी साक्षी मलिक (Sakshee Malikkh), बजरंग पूनिया (Bajrang Punia) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) हे तिघेही सोमवारपासून आपल्या सरकारी नोकरीमध्ये रुजू झाले आहेत. हे तिघेही रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. रेल्वेचे पब्लिक रिलेशन डायरेक्टर जनरल योगेश बवेजा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर कुस्तीपटूंचं आंदोलन संपुष्टात येण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं. मात्र त्यानंतर काही वेळातच कुस्तीपटूंनी यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. आम्हाला नोकरी काढून घेण्यासंदर्भातील भिती दाखवली जात आहे. मात्र गरज पडली तर आम्ही 10 सेकंदांमध्ये नोकरीचा राजीनामा देऊ असं कुस्तीपटूंनी म्हटलं आहे.
साक्षी मलिक म्हणाली आंदोलन मागे घेतलेलं नाही
आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नोकरीवर रुजू झाल्याच्या वृत्तासंदर्भात बोलताना आम्ही आंदोलन मागे घेतल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. साक्षी मलिकने ट्वीट करुन आंदोलन मागे घेण्यात आल्याचा दावा फेटाळला आहे. "न्याय मिळेपर्यंत आमची लढाई सुरुच राहणार आहे," असं साक्षीने म्हटलं आहे. तर बजरंग पूनियाने "एफआयआर मागे घेण्यात आल्याचं वृत्त खोटं आहे. आमची लढाई सुरु आहे," असं म्हटलं आहे.
10 सेकंदांचा वेळही लागणार नाही
या आंदोलनामध्ये आघाडीवर असलेल्या विनेश फोगाटनेही ट्वीटरवरुन प्रतिक्रीया नोंदवली आहे. "आमची पदकं 15-15 रुपयांची असल्याचं सांगणारे आता आमच्या नोकऱ्यांच्या मागे लागले आहेत. आम्ही आमचे प्राण पणाला लावले आहेत. यापुढे ही नोकरी तर फार छोटी गोष्ट आहे. आम्हाला जर ही नोकरी न्यायाच्या वाटेवरील अडथळा वाटू लागतील तर आम्हाला ही नोकरी सोडण्यासाठी 10 सेकंदांचा वेळही लागणार नाही. आम्हाला नोकऱ्यांची भिती दाखवू नका," असं विनेशने सरकारी यंत्रणांना ठणकावून सांगितलं आहे.
"महिला कुस्तीपटूंना होणाऱ्या मानसिक ताणासंदर्भातील थोडीही कल्पना खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना आहे का? प्रसारमाध्यमांचे पाय हे एखाद्या गुंडाच्या चाबकासमोर थरथरु लागतात. महिला कुस्तीपटूंचं असं होतं नाही," असा टोलाही विनेशने लगावला आहे.
अमित शाहांची भेट
दरम्यान, शनिवारी रात्री महिला कुस्तीपटूंनी तसेच त्यांच्याबरोबर आंदोलना सहभागी झालेल्या अनेकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. नवी दिल्ली येथील शाह यांच्या घरीच ही भेट रात्री 11 वाजता पार पडली. तासभर चालेल्या या बैठकीमध्ये कुस्तीपटूंनी कोणताही भेदभाव न करता बृजभूषण सिंह प्रकरणाची चौकशी केली जावी आणि लवकरात लवकर यासंदर्भातील अहवाल सादर केला जावा अशी मागणी केली. यावेळी शाह यांनी कायदेशीर मार्गाने प्रक्रिया सुरु असून कायदेशीर प्रक्रियेसाठी आवश्यक तो वेळ द्यावा लागेल असं कुस्तीपटूंना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली.