मुंबई : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या मागणीला भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगनंही पाठिंबा दिला आहे. भारतानं ही मॅच खेळली नाही तरी वर्ल्ड कप जिंकता येईल, असा विश्वास हरभजननं व्यक्त केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन म्हणाला, 'भारतानं वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. भारतीय टीम एवढी मजबूत आहे, की पाकिस्तानविरुद्ध न खेळताही वर्ल्ड कप जिंकेल. ही वेळ कठीण आहे. भारतावर हल्ला झालेला आहे. सरकार कडक कारवाई करेलच, पण क्रिकेटमध्येही आपण त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. नाहीतर आहे तसंच सुरु राहिलं. आपल्याला देशासोबत उभं राहावं लागेल. क्रिकेट किंवा हॉकी कुठेच आपण पाकिस्तानशी खेळू नये.'


पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधल्या वेगवेगळ्या स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो हटवण्यात आले. मुंबईतील सीसीआय, मोहाली आणि जयपूरच्या स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो हटवले गेले आहेत. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)ने देखील वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी केली आहे.


पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)लाही दणका बसला आहे. पीएसएलचं प्रक्षेपण करणाऱ्या आयएमजी रिलायन्सनं पीएसएल दाखवायला नकार दिला. यामुळे पीएसएल दाखवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला प्रक्षेपण करणारी दुसरी कंपनी शोधावी लागणार आहे.