डबलिन : भारताविरुद्धच्या दोन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी आयर्लंडनं १४ खेळाडूंच्या टीमची घोषणा केली आहे. गॅरी विल्सनकडे या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. या टीममध्ये पंजाबमध्ये जन्म झालेल्या सिमरनजीत 'सिमी' सिंग याचाही समावेश आहे. सिमी सिंग हा ऑफ स्पिनर आहे. २७ जून आणि २९ जूनला भारत आणि आयर्लंडमध्ये दोन टी-20 मॅच होणार आहेत. सिमी सिंगनं न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पण या मॅचनंतर कोणत्याही मोठ्या टीमविरुद्ध खेळण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. सिमी सिंगनं आत्तापर्यंत ७ वनडे आणि ४ टी-20 मॅच खेळल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध खेळताना सिमीनं ३ विकेट घेतल्या. याचबरोबर त्यानं या मॅचमध्ये अर्धशतकही केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका ट्राय सीरिजमध्ये सिमीनं एक अर्धशतक आणि १५० च्या स्ट्राईक रेटनं ९६ रन केले होते. या टी-20 ट्राय सीरिजमध्ये सिमी सहावा आणि आयर्लंडचा तिसरा सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला होता. या सीरिजमध्ये त्यानं ६ विकेटही घेतल्या होत्या.


सिमी सिंगचा जन्म पंजाबच्या खरड जिल्ह्यातल्या बथलाना गावात झाला आहे. आयर्लंडकडून खेळताना सिमीनं ८ वनडे आणि ६ टी-20 विकेट घेतल्या आहेत. सिमी सिंग पंजाबच्या अंडर-१४, अंडर-१७ आणि अंडर-१९ टीमकडून खेळला आहे. पण यानंतर सिमीला संधी मिळाली नाही. मित्रानं दिलेल्या सल्ल्यामुळे सिमी डबलिनला पोहोचला आणि तिकडूनच क्रिकेट खेळायला लागला. भारताकडून क्रिकेट खेळण्याचं सिमीचं स्वप्न होतं. पण संधी न मिळाल्यामुळे त्याला दुसऱ्या देशात जाऊन क्रिकेट खेळावं लागलं.


३१ वर्षांचा सिमी २००६ साली आयर्लंडमध्ये स्थायिक झाला. सिमी सिंग युजवेंद्र चहल, सिद्धार्थ कौल, मनप्रीत गोणी आणि गुरकिरत सिंग यांच्यासोबत क्रिकेट खेळला आहे. पंजाबकडून खेळताना सिमी बॅट्समन होता पण आयर्लंडमध्ये गेल्यावर त्यानं ऑफ स्पिन बॉलिंग करायलाही सुरुवात केली. आयर्लंडच्या टीममध्ये आता सिमी ऑलराऊंडर आहे.


भारत आणि आयर्लंडमध्ये आत्तापर्यंत फक्त एकच मॅच झाली आहे. इंग्लंडमध्ये २००९ साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीम एकमेकांना भिडल्या होत्या. ही मॅच भारतानं ४.३ ओव्हर राखून जिंकली होती. झहीर खाननं या मॅचमध्ये १९ रन देऊन ४ विकेट घेतल्या होत्या.