मुंबई : कायरन पोलार्डच्या झंझावाती खेळीमुळे मुंबईनं पंजाबपुढे १८७ रनचं आव्हान ठेवलं आहे. टॉस जिंकून पंजाबनं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. या मॅचमध्ये मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. स्कोअरबोर्डवर ३७ रन असताना एव्हिन लुईस ९ रनवर आऊट झाला. तर फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादवनं १५ बॉलमध्ये २७ रन केले. रोहित शर्माला या मॅचमध्येही अपयश आलं. १० बॉलमध्ये ६ रन करून तो आऊट झाला. कायरन पोलार्ड आणि कृणाल पांड्यानं मुंबईचा डाव सावरला. पोलार्डनं २३ बॉलमध्ये ५० रन केले. यामध्ये ३ सिक्स आणि ५ फोरचा समावेश होता. तर कृणाल पांड्यानं २३ बॉलमध्ये ३२ रन केले. पंजाबकडून अॅण्ड्रयू टायनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. अश्विनला २ आणि स्टॉयनिस-अंकित राजपूतला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.


मुंबईसाठी करो या मरो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान कायम ठेवण्यासाठी आज मुंबईला पंजाबविरुद्धची मॅच जिंकणं आवश्यक आहे. आजची मॅच हारली तर मुंबईला प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होता येणार नाही. पण ही मॅच जिंकली तरी रोहित शर्माच्या टीमला त्यांची पुढची मॅच जिंकावी लागणार आहे. या दोन्ही मॅच जिंकल्यानंतर मुंबईचे १४ मॅचमध्ये १४ पॉईंट्स होतील. दोन्ही मॅच जिंकल्यावर आणि दुसऱ्या टीमच्या कामगिरीवरच मुंबईचं प्ले ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न अवलंबून आहे. मुंबईचा नेट रनरेट इतर टीमपेक्षा चांगला असल्यामुळे दोन्ही मॅच जिंकून मुंबई प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकते. पण या दोन्ही मॅचपैकी एकही मॅच मुंबई हारली तर त्यांचं प्ले ऑफचं स्वप्न भंगेल.


मुंबई सहाव्या क्रमांकावर


आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईनं १२ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे १० पॉईंट्स आहेत. तर पंजाबच्या टीमनं १२ मॅचपैकी ६ मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांच्याकडे १२ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. आजची मॅच मुंबई जिंकली तर ते चौथ्या क्रमांकावर जातील.