मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकला
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईनं एक बदल केला आहे. ड्युमिनीऐवजी टीममध्ये कायरन पोलार्डला संधी देण्यात आली आहे. तर पंजाबनं मयांक अग्रवाल आणि करुण नायरऐवजी युवराजसिंग आणि मनोज तिवारीला टीममध्ये घेतलं आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठीचं आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही टीमना ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. या मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला तर प्ले ऑफमध्ये जायचं स्वप्न भंगेल.
मुंबईची टीम
सूर्यकुमार यादव, एव्हिन लुईस, रोहित शर्मा, ईशान किशन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, जसप्रीत बुमराह, मयांक मार्कंडे
पंजाबची टीम
ख्रिस गेल, लोकेश राहुल, अॅरन फिन्च, युवराज सिंग, मनोज तिवारी, मार्कस स्टोयनिस, अक्सर पटेल, रवीचंद्रन अश्विन, ऐन्ड्रू टाय, मोहित शर्मा, अंकीत राजपूत
मुंबईसाठी करो या मरो
प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं आव्हान कायम ठेवण्यासाठी आज मुंबईला पंजाबविरुद्धची मॅच जिंकणं आवश्यक आहे. आजची मॅच हारली तर मुंबईला प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होता येणार नाही. पण ही मॅच जिंकली तरी रोहित शर्माच्या टीमला त्यांची पुढची मॅच जिंकावी लागणार आहे. या दोन्ही मॅच जिंकल्यानंतर मुंबईचे १४ मॅचमध्ये १४ पॉईंट्स होतील. दोन्ही मॅच जिंकल्यावर आणि दुसऱ्या टीमच्या कामगिरीवरच मुंबईचं प्ले ऑफमध्ये खेळण्याचं स्वप्न अवलंबून आहे. मुंबईचा नेट रनरेट इतर टीमपेक्षा चांगला असल्यामुळे दोन्ही मॅच जिंकून मुंबई प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकते. पण या दोन्ही मॅचपैकी एकही मॅच मुंबई हारली तर त्यांचं प्ले ऑफचं स्वप्न भंगेल.
मुंबई सहाव्या क्रमांकावर
आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबईनं १२ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे १० पॉईंट्स आहेत. तर पंजाबच्या टीमनं १२ मॅचपैकी ६ मॅचमध्ये विजय मिळवल्यामुळे त्यांच्याकडे १२ पॉईंट्स आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब पाचव्या क्रमांकावर आहे. आजची मॅच मुंबई जिंकली तर ते चौथ्या क्रमांकावर जातील.
रोहितचा फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय
कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म हा मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. १२ मॅच खेळणाऱ्या रोहितनं २६.७०च्या सरासरी आणि १३७.६२च्या स्ट्राईक रेटनं २६७ रन बनवल्या आहेत. याचबरोबर रोहितनं या मोसमात एक लाजीरवाणं रेकॉर्डही स्वत:च्या नावावर केलं आहे.
रोहितचं लाजीरवाणं रेकॉर्ड
वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकं करणाऱ्या रोहितनं आयपीएलच्या १० वर्षांमधलं खराब रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. या आयपीएलमध्ये रोहित शर्मा ३ वेळा पहिल्या बॉलवर झाला आहे. आयपीएलच्या याआधीच्या १० मोसमांमध्ये रोहित शर्मा कधीच पहिल्या बॉलवर आऊट झाला नव्हता. आयपीएलच्या इतिहासामध्ये रोहित शर्मा ७ वेळा शून्यवर आऊट झाला आहे. यापैकी तीन वेळा तर याच मोसमात तो शून्यवर आऊट झाला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यवर आऊट होण्याचं रेकॉर्ड गौतम गंभीरच्या नावावर आहे. गंभीर १०वेळा शून्यवर आऊट झाला आहे.
रोहितची ईशान किशनच्या रेकॉर्डशी बरोबरी
आयपीएलच्या या मोसमात शून्यवर आऊट होण्याच्या बाबतीत रोहितनं त्याच्याच टीममधला सहकारी इशान किशनशी बरोबरी केली आहे. रोहितबरोबरच ईशान किशनही यावर्षी ३ वेळा शून्यवर आऊट झाला आहे.
पंजाब गेल-राहुलवर अवलंबून
आयपीएलच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या पंजाबचा फॉर्म अचानक घसरला आहे. पहिल्या ७ मॅचपैकी ५ मॅच पंजाब जिंकलं होतं पण नंतरच्या ५ पैकी एका मॅचमध्येच पंजाबला विजय मिळवता आला. पंजाबचे ओपनर के.एल.राहुल आणि ख्रिस गेल यांच्याशिवाय कोणत्याच बॅट्समनला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरूविरुद्धच्या मागच्या मॅचमध्ये तर पंजाबचा फक्त ८८ रनवर ऑल आऊट झाला होता.