Video : वडिलांनी मारली मिठी तर आईला अश्रू अनावर... निवृत्तीनंतर भारतात परतलेल्या अश्विनचं घरी जंगी स्वागत
R Ashwin Return To India : एअरपोर्टवरून अश्विन जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि चाहते तेथे स्वागतासाठी तयार होते आणि बँडबाजा वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले.
R Ashwin Retirement : भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन ( R Ashwin) याने बुधवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. निवृत्तीची घोषणा केल्यावर अश्विन ऑस्ट्रेलियात असलेल्या टीम इंडियाची साथ सोडून गुरुवारी पुन्हा भारतात परतला. यावेळी चेन्नई एअरपोर्टवर अश्विनचे आगमन झाल्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी अश्विनचे स्वागत केले. तसेच यावेळी चाहत्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. एअरपोर्टवरून अश्विन जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि चाहते तेथे स्वागतासाठी तयार होते आणि बँडबाजा वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले.
आर अश्विनने 2010 मध्ये श्रीलंके विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचं एकूण क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. नॅशनल ड्यूटी वरून निवृत्त झालेल्या आर अश्विनचे गुरुवारी चेन्नई येथील घरी जोरदार स्वागत करण्यात आले. अश्विन घरी परतल्यावर त्याचे फॅन्स आणि कुटुंबीय त्याच्या स्वागतासाठी उभे होते. अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली तर आई चित्रा या फार भावुक झाल्या होत्या. अश्विनने आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यांना मिठी मारली. चाहत्यांनी आणलेल्या फुलांच्या हारांचा अश्विनने स्वीकार केला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
हेही वाचा : कोणत्या महालापेक्षा कमी नाही आर अश्विनचं चेन्नईतील आलिशान घर, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल
पाहा व्हिडीओ :
आर अश्विन निवृत्त झाला असला तरी आयपीएल 2025 मध्ये तो चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना दिसणार आहे. अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विन या भारताच्या स्टार स्पिनरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 765 विकेट्स घेतले आहेत. आर अश्विनने 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स आणि 3503 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 116 सामन्यात 156 विकेट्स आणि 707 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये अश्विनने 65 सामन्यात 72 आणि 31 धावा केल्या आहेत.
घरी परतल्यावर काय म्हणाला अश्विन?
आर अश्विन म्हणाला की, 'मी CSK कडून खेळणार आहे आणि मी शक्य तितक्या दिवस खेळण्याचा प्रयत्न केला आणि आकांक्षा बाळगली तर आश्चर्य वाटायला नको. अश्विन भारतीय क्रिकेटपटू म्हणून थांबला असला तरी अजूनही माझ्यात क्रिकेट शिल्लक आहे. माझा हा निर्णय बऱ्याच लोकांसाठी भावनिक असेल पण माझ्या मनात आराम आणि समाधानाची भावना आहे. निवृत्त होण्याचा विचार काही काळापासून माझ्या डोक्यात चालू होता. मला सामन्याच्या चौथ्या दिवशी ते जाणवले आणि पाचव्या दिवशी मी माझा निर्णय वरिष्ठांना सांगितला'.