बंगळुरू : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडनं बंगळुरूमधल्या एका कंपनीविरोधात सदाशीव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या कंपनीमध्ये द्रविडनं २० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती पण फक्त १६ कोटी रुपयेच परत मिळाले. आपली ४ कोटी रुपयांची फसवणूक झाली, अशी तक्रार राहुल द्रविडनं केली आहे. विक्रम इनव्हेस्टमेंट असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीनं ८०० गुंतवणूकदारांना ३०० कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा ३ मार्चला समोर आला. पीआर बालाजी नावाच्या गुंतवणूकदारानं कंपनीविरोधात ११.७४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. याप्रकरणी विक्रम इनव्हेस्टमेंटचे डायरेक्टर राघवेंद्र श्रीनाथ यांच्यासोबत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कंपनीनं ४० ते ५० टक्के परतावा देण्याचं आश्वासन ग्राहकांना दिलं होतं. फक्त राहुल द्रविडच नाही तर सायना नेहवाल आणि प्रकाश पदुकोण यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनीही या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती.


या आरोपींपैकी अटकेत असलेला सुतराम सुरेश हा माजी क्रीडा पत्रकार होता. खेळाडूंनी सुरेशच्या माध्यमातून या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती. डायरेक्टर राघवेंद्रच्या अटकेनंतर फसवणूक झालेले अनेकजण समोर आले आहेत. जवळपास १०० जणांनी कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे. राघवेंद्रनं गुंतवणूकदारांचे पैसे परदेशात पाठवल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे.