एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून न्यूझीलंड आणि गतविजेता इंग्लंड संघात पहिला सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडच्या तरुण आणि नवख्या खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या सामन्यात रचिन रवींद्रने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 39 चेंडूत 123 धावा ठोकल्या. केन विल्यमसनच्या जागी रचिनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. या सामन्यानंतर रचिनसह त्याच्या नावाचीही चांगलीच चर्चा रंगली होती. रचिनचे आई-वडील दोघेही भारतीय असून त्याच्या नावामागे एक रंजक गोष्ट आहे. रचिनचे आई-वडील सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे फार मोठे चाहते असून, त्या दोघांच्या नावावरुन त्यांनी मुलाचं नाव ठेवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रचिनने आपल्या नावासह फलंदाजीने क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान त्याच्या नावात आपला वाटा आहे हे समजल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडने यावर भाष्य केलं आहे. त्याच्यावर माझा कमी आणि सचिनचा प्रभाव जास्त असल्याचं राहुल द्रविडने उपाहासत्मकपणे म्हटलं आहे. रचिनच्या आई आणि वडिलांचा दोघांचाही जन्म बंगळुरुत झालेला आहे. 


"मी त्याला फलंदाजी करताना पाहिलं. त्याने एकूण 5 षटकार ठोकले. मला वाटतं त्यावेळी 'चीन' जास्त दिसलं. मला वाटत नाही मी कधी स्क्वेअरला फटका लगावला आहे. मी स्क्वेअरला शॉट मारुच शकत नाही. मला वाटतं त्याला सचिनने जास्त मदत केली," असं राहुल द्रविड हसत सांगत होता. 


राहुल द्रविडने यावेळी आपण त्याची संपूर्ण खेळी पाहिली आणि प्रभावित झाल्याचं सांगितलं. "हो मी तुकड्यांमध्ये पाहिलं. मला वाटतं ते दोघेही फार चांगलं खेळले. न्यूझीलंडला स्पर्धेत चांगली सुरुवात मिळाली आहे," असं राहुल द्रविडने म्हटलं आहे. 2021 मध्ये कानपूरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात रचिन अगदी शेवटी मैदानात उतरला होता. यावेळी त्याने जवळपास अर्धा तास फलंदाजी करत हा सामना बरोबरीत सोडवला होता.


"हो मला वाटतं कानपूरमध्ये तो भारताविरोधात कसोटी सामना खेळला होता. मला चांगलंच लक्षात आहे, कारण त्याने तो कसोटी सामना वाचवला होता," असं राहुल द्रविड म्हणाला. दरम्यान भारत रविवारी वर्ल्डकपमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरोधात हा सामना होणार आहे.