भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये अद्यापही त्याला हवा तो सूर गवसलेला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 25 डाव खेळले असून, यामध्ये त्याने 24.40 च्या सरासरीने फक्त दोन अर्धशतकं ठोकली आहेत. पण यानंतरही भारतीय संघ मात्र सूर्यकुमारवर पूर्णपणे विश्वास दाखवताना दिसत आहे. सूर्यकुमार यादव कोणत्याही क्षणी संपूर्ण डावच उलटवू शकतो असा संघाला विश्वास आहे. यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने एक मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल द्रविडने सूर्यकुमार यादवला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. सहाव्या क्रमांकावर खेळताना सूर्यकुमार यादव फार प्रभावी कामगिरी करु शकतो असं राहुल द्रविडचं म्हणणं आहे. वर्ल्डकप संघात सूर्यकुमार स्थान देताना आपल्या मनात कोणतीही शंका नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. भारतीय संघाला वर्ल्डकप संघात बदल करण्यासाठी 27 सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. 


"मला वाटत नाही की, सूर्यकुमार यादवने 27 तारखेची चिंता करावी. आम्ही वर्ल्डकपसाठी संघ निवडला आहे आणि त्यात सूर्यकुमार यादवची जागा ठरलेली आहे," असं राहुल द्रविडने ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या सामन्याआधी संवाद साधताना सांगितलं. 


"आमचा निर्णय झाला आहे आणि आमचा त्याला पुरेपूर पाठिंबा आहे. कारण त्याच्यात दर्जा आणि क्षमता दोन्ही आहेत. टी-20 क्रिकेटदरम्यान आम्ही ते गुण पाहिले आहेत. सहाव्या क्रमांकावर खेळताना तो काय प्रभाव पाडू शकतो याची आम्हाला कल्पना आहे," असं राहुल द्रविडने सांगितलं आहे.


"सूर्यकुमार यादव सगळा डावच पालटू शकतो. त्यामुळे आम्ही त्याला पाठिंबा देत आहोत. आमचं मत याबद्दल स्पष्ट आहे. आमचा त्याला पाठिंबा आहे याबाबत स्पष्टता आहे आणि तो हा विश्वास सार्थ ठरवेल अशी आशा आहे," असं राहुल द्रविडने म्हटलं आहे.