मुंबई : रविवारी झालेल्या कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामन्यामध्ये कोहलीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. ११ व्या सीजनमधील २९ व्या सामन्यामध्ये ६ विकेट्सने कोलकात्याने हा विजय मिळवला. आयपीएल सामने पाहाण्यासाठी अनेक माजी खेळाडू मैदानावर येत असतात. असाच एक खेळाडू बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी पोहोचला होता. पण तो व्हीआयपी बॉक्समध्ये नाही तर सामान्य प्रेक्षकांमध्ये बसला होता. सोशल मीडियावर याची खूप चर्चा आहे.


भारताचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड हा त्याच्या सरळ आणि साध्या स्वभावामुळे ओळखला जातो. द्रविडची शांत खेळाडू म्हणून ओळख आहे. याआधी देखील त्याच्या स्वभावामुळे त्याने अनेकांचटी मनं जिंकली आहेत. द्रविड आयपीएलचा सामना पाहण्यासाठी रविवारी सामान्य लोकांमध्ये जाऊन बसला होता. द्रविडने व्हीआयपी बॉक्सच्या ऐवजी सामान्य प्रेक्षकांमध्ये जावून बसणं पसंत केलं. सोशल मीडियावर द्रविडच्या या गोष्टीचं खूप कौतूक होत आहे,. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आयपीएलने त्याच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'पाहा बंगळुरुला सपोर् करण्यासाठी कोण आलं आहे. द वॉल, द लिजेंड, राहुल द्रविड'.