बंगळुरू : राहुल द्रविडचा मुलगा समित हा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४ टूर्नामेंट असलेल्या बीटीआर कपमध्ये समितनं खणखणीत शतक ठोकलं. माल्ल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलकडून खेळताना समितनं ही खेळी केली. या मॅचमध्ये माल्ल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलनं विवेकानंद स्कूलचा तब्बल ४१२ रन्सनी पराभव केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये समितनं १५० रन्सची खेळी केली. पण या मॅचमधला समितचा हा सर्वाधिक स्कोअर नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू सुनिल जोशीचा मुलगा आर्यन जोशीनं १५४ रन्स केले. समित आणि आर्यनच्या शतकाच्या जोरावर माल्ल्या आदिती इंटरनॅशनल स्कूलनं ५० ओव्हरमध्ये ५००/५ रन्स केल्या.


समित आणि आर्यनच्या शतकी खेळीनंतर बॉलर्सनीही उल्लेखनीय कामगिरी करून विवेकानंद स्कूलला ८८ रन्सवर ऑल आऊट केलं.


समित द्रविडची चर्चेत यायची ही काही पहिली वेळ नाही. याआधी दोन वर्षांपूर्वी समितनं बंगलोर युनायटेड क्लबकडून खेळताना फ्रँक अॅन्थनी पब्लिक स्कूलविरुद्ध १२५ रन्स केल्या होत्या. टायगर कप क्रिकेट टूर्नामेंटमधल्या या मॅचमध्ये समित द्रविडनं १२ फोर लगावल्या होत्या.


सप्टेंबर २०१५मध्ये समित द्रविडला अंडर-१२ गोपालन क्रिकेट चॅलेंजमध्ये सर्वोत्तम बॅट्समनचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. या सीरिजमध्ये माल्ल्या आदितीकडून खेळताना समित द्रविडनं ७७ नाबाद, ९३ आणि फायनलमध्ये पुन्हा ७७ रन्स केल्या होत्या.