Rahul Dravid On Ishan Kishan : दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव (IND vs ENG 2nd Test) करून टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. टीम इंडियासाठी अडचणीचा ठरतेय विकेटकिपर फलंदाजाची जागा... केएस भरतला संधी देऊन देखील उत्तम कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता सोशल मीडियावर इशान किशनच्या (Ishan Kishan) नावाची चर्चा होताना दिसतेय. टीम इंडियाचा विकेटकिपर फलंदाज इशान किशनला या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाही. तो संघात पुनरागमन कधी करणार यावर अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. मात्र, इशान किशन सध्या कुठं आहे? आणि तो टीम इंडियामध्ये कधी परतणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी इशान किशनला कडक शब्दात इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले राहुल द्रविड?


टीममध्ये परतण्यासाठी इशान किशनला नियमितपणे क्रिकेट खेळण्याची गरज आहे. ईशानला सतत खेळावं लागेल. त्यानंतरच त्याला संघात घेण्याचा विचार केला जाईल, असं म्हणत राहुल द्रविड यांनी इशान किशनला सुचक इशारा दिला आहे. याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील इशान किशनच्या सतत संपर्कात आहे, असं राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे. मी त्याला कधीही म्हटलं नाही की जा आणि डोमेस्टिक क्रिकेट खेळ, आम्ही त्याला काहीही करण्यास फोर्स करत नाही, असंही राहुल द्रविड यांनी म्हटलं आहे.


राहुल द्रविड यांनी इशान किशनला रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला दिला होता, अशी चर्चा सोशल मीडियावर होत होती. त्यावर आता राहुल द्रविड यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम  दिला आहे. टीममधील अनुशासनहीनतेबद्दल इशान किशनला बीसीसीआयने शिक्षा दिली आहे, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.



दरम्यान, डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत इशान किशन अखेरचा टीम इंडियाकडून खेळताना दिसला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेसाठी इशान किशनच्या नावाची घोषणा झाली होती. मात्र, मानसिक तणावामुळे इशान किशनने या कसोटी मालिकेतून आपलं नाव मागं घेतलं होतं. त्यानंतर इशानने इंग्लंडविरुद्ध देखील अनुपस्थित असल्याचं बीसीसीआयला सांगितलं होतं.