नवी दिल्ली: भारतीय संघाला बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्युझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. साहजिकच यामुळे लाखो भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज कोट्यावधी लोकांचे हदय तुटले असेल. मात्र, भारतीय संघाने खूप चांगली लढत दिली. याबद्दल ते प्रेम आणि आदराचे धनी आहेत. न्यूझीलंडने त्यांचा विजय 'कमावला' आहे, त्यासाठी त्यांचे अभिनंदन. यामुळेच ते विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


Ind vs NZ: टीम इंडियाच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी म्हणतात....


या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत वाईट झाली. रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल आणि दिनेश कार्तिक झटपट बाद झाल्याने पहिल्या दहा षटकांमध्येच भारताची अवस्था ४ बाद २४ अशी केविलवाणी झाली होती. यानंतर ऋषभ पंत(३२) आणि हार्दिक पंड्या (३२) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. सँटनरच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात पंत झेलबाद झाला. 



यानंतर धोनीने एक बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवली. त्याने रवींद्र जाडेजाच्या साथीने शतकी भागीदारी केली. जडेजाच्या फटकेबाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करण्याच्या नादात जाडेजा आणि धोनी बाद झाले आणि भारताचा पराभव झाला. जाडेजाने ५९ चेंडूत ७७ धावांची खेळी साकारली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने १० षटकांमध्ये ३६ धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.