विजय-राहुलनं भारताचा डाव सावरला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं शानदार कमबॅक केलं आहे.
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं शानदार कमबॅक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेला १९४ रन्सवर ऑल आऊट केल्यावर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंगला आलेल्या भारतानं सावध सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर ४९/१ एवढा झाला आहे. यामुळे भारताकडे आता ४२ रन्सची आघाडी मिळाली आहे. मुरली विजय १३ रन्सवर नाबाद तर के.एल.राहुल १६ रन्सवर नाबाद खेळत आहे.
झटपट रन्स बनवण्यासाठी भारतानं पार्थिव पटेलला ओपनिंगला बोलावलं होतं. पण त्यालाही फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. १५ बॉल्समध्ये १६ रन्स करुन पटेल आऊट झाला. पटेलच्या या खेळीमध्ये ३ फोरचा समावेश होता. फिलँडरनं पटेलला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
दक्षिण आफ्रिका १९४ रन्सवर ऑल आऊट
पहिल्या इनिंगमध्ये १८७ रन्सवर ऑल आऊट झाल्यावर भारतीय बॉलर्सनीही आफ्रिकेच्या बॅट्समनची दाणादाण उडवली आणि १९४ रन्सवर आफ्रिकेला ऑल आऊट केलं. यामुळे दक्षिण आफ्रिकेला ९ रन्सची मामुली आघाडी मिळाली आहे.
भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वर कुमारला ३ विकेट्स मिळाल्या. इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलानं सर्वाधिक ६१ रन्स केल्या. दुसऱ्या दिवसाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेनं ६/१ अशी केली होती.
तीन टेस्ट मॅचची ही सीरिज भारतानं आधीच गमावली आहे. केप टाऊनमध्ये आणि सेंच्युरिअनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला व्हाईट वॉश टाळण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.