Mumbai Indians vs Rajasthan Royals : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात आयपीएलचा चौदावा सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरात पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. राजस्थानसाठी रियान पराग (Riyan Parag) याने दमदार अर्धशतक ठोकलं. तर गोलंदाजीत ट्रेंड बोल्टने (Trent Boult) 3 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीची कंबर मोडली. मुंबईकडून आकाश मधवालने (Akash Madhwal) 3 विकेट्स घेतल्या पण राजस्थानने मुंबईने दिलेलं 126 धावांचं आव्हान आरामात पूर्ण केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना मुंबईला केवळ 125 धावा करता आल्या. त्यामुळे राजस्थान मुंबईने दिलेलं इवलुसं आव्हान किती ओव्हरमध्ये पार करणार? असा प्रश्न विचारला जात होता. मुंबईची गोलंदाजी पुन्हा फेल ठरली. 17 वर्षांच्या क्वेना मफाकाने यशस्वीची विकेट काढली अन् मुंबईच्या आशा जिवंत झाल्या. मात्र, राजस्थानने बॉलरला ढिल्लं पडू दिलं नाही. संजू आणि बटलरने आक्रमक सुरूवात करून दिली अन् राजस्थान 4 ओव्हरमध्ये 40 वर आली. त्यानंतर दोन्ही फलंदाज बाद झाले अन् पुन्हा मुंबईने डोकं वर काढलं. त्याचवेळी रियान पराग पुन्हा एकदा मैदानात पाय जमवू लागला. त्याला साथ दिली ती अँकर बॅटर म्हणून आलेला आर आश्विन... आश्विनने एक बाजू जमवली अन् 16 बॉलमध्ये 16 धावा केल्या. त्यानंतर रियाने आपलं काम केलं. रियानने 54 धावांची खेळी केली अन् राजस्थानला विजयाच्या पार केलं.


राजस्थानने फलंदाजीचं दिलेलं आव्हान स्विकारून फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सला चांगली सुरूवात करता आली नाही. मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा, नमन धीर आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिस या तिघांना ट्रेंड बोल्डने भोपळा देखील फोडून दिला नाही. त्यामुळे 14 वर 3 आऊट अशी परिस्थिती मुंबई इंडियन्सची झाली होती. इशान किशनने हात उघडले पण नांद्रे बर्गरने इशानला बाहेरचा रस्ता दाखवला. तिलक वर्मा आणि कॅप्टन हार्दिक पांड्याने मैदानावर पाय रोवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना म्हणावी तशी आक्रमता दाखवता आली नाही. तिलकने 29 बॉलमध्ये 32 धावा केल्या. तर पांड्याने 21 बॉलमध्ये 34 धावांची मुंबईकडून सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर मुंबईच्या शेपटाने चोरट्या धावा घेत मुंबई इंडियन्सला 125 धावांवर पोहोचवलं. 



संजय मांजरेकरांची प्रेक्षकांना तंबी


स्टेडियमवरील प्रेक्षक रोहित रोहितचा नारा लगावताना दिसले. संजय मांजरेकर यांनी टॉसवेळी मुंबईच्या वानखेडे मैदानावर उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना तंबी दिली. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्यासाठी टाळ्या वाजवा अन् नीट वागा, असं संजय मांजरेकर यावेळी म्हणाले. त्यावेळी हार्दिक पांड्या हसताना दिसला. 


मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (C), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका.


राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (C), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.