मुंबई :  अंडर 19 वर्ल्ड कप 2022 (Under 19 World Cup 2022) मधील टीम इंडियाचा (Team India) कर्णधार यश धूलचा (Yash Dhull) धमाका रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) कायम आहे. यशने रणजी ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना तामिळनाडू विरुद्धच्या (Delhi vs Tamilnadu) सामन्यातील दुसऱ्या डावातही खणखणीत शतक ठोकलंय. विशेष म्हणजे यशने पदार्पणातील सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. यासह यश हा डेब्यू सामन्यातील दोन्ही डावात शतक ठोकणारा एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. (ranji Trophy 2022 del vs tnca delhi yash dhull scored hundred in each innings on his first class debut at guwahati)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशने तामिळनाडू विरुद्ध दुसऱ्या डावात फोर मारुन 200 चेंडूत शतक पूर्ण केलं. यशच्या फर्स्ट क्लासमधील हे दुसरं शतक ठरलं. याआधी यशने या सामन्यातील पहिल्या डावात 133 बॉलच्या मदतीने शतक पूर्ण केलं होतं. यशने पहिल्या डावात 113 धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने 18 फोर खेचले होते. 


यशचा दिग्गजांच्या यादीत समावेश 


यशच्या आधी 2 फलंदाजांनाच पदार्पणातील सामन्यातील दोन्ही डावात शतक लगावण्याचा कारनामा केला होता. नारी कॉन्ट्रेक्टर आणि महाराष्ट्राच्या विराग आवटे या दोघांनी हा पराक्रम केला होता. 


कॉन्ट्रॅक्टर यांनी गुजरातकडून खेळताना 1952-53 मध्ये डेब्यू केलं होतं. या सामन्यात त्यांनी पहिल्या डावात 152 तर दुसऱ्या डावात 102 धावा केल्या होत्या. 


तर विराग आवटेने 2012-13 मध्ये डेब्यू सामन्यातील पहिल्या इनिंगमध्ये 126 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 112 रन्स कुटल्या होत्या.