मुंबई : रणजी ट्रॉफीच्या कर्नाटक आणि तामीळनाडूमधल्या मॅचमध्ये मोठा वाद झाला आहे. तामीळनाडूचा बॅट्समन-विकेट कीपर दिनेश कार्तिक आणि कर्नाटकचा खेळाडू करुण नायर यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आहे. मॅच संपल्यानंतर दिनेश कार्तिक करुण नायरला भिडल्याचं वृत्त आहे. अंपायर आणि मॅच रेफ्री यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण शांत झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिक बॅटिंग करत असताना कर्नाटकच्या खेळाडूंनी वारंवार अपील केलं, यामुळे कार्तिकचा पारा चढला, असं तामीळनाडूचा कर्णधार विजय शंकर याने सांगितलं आहे. तसंच या मोसमात तामीळनाडूचा कर्नाटककडून ४ वेळा पराभव झाला आहे, त्यामुळेही कार्तिकचा स्वत:वरचा ताबा सुटल्याचं बोललं जात आहे.


कर्नाटक आणि तामीळनाडू यांच्यातली मॅच संपल्यानंतर आणि प्रेझेंटेशन सेरेमनी आटोपल्यावर कर्नाटकचा कर्णधार करुण नायरवर कार्तिक संतापला. ड्रेसिंग रुमच्या बाहेर कार्तिकने करुण नायरला अडवलं आणि त्याच्यासोबत हुज्जत घातली. त्यावेळी अंपायर आले आणि दोघांना रोखलं. मॅन ऑफ द मॅचची घोषणा झाल्यानंतरही दिनेश कार्तिक संतापला आणि करुण नायरवर बरसला.


तामीळनाडूची दुसरी इनिंग सुरु असताना कर्नाटकच्या खेळाडूंनी वारंवार अपील केली, त्यामुळे कार्तिक चिडला, असं सांगितलं जात आहे. दोन्ही टीममध्ये जेव्हा मुकाबला होतो, तेव्हा असे प्रसंग घडतात. जर असं घडलं नाही तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं आहे, असं विजय शंकर म्हणाला. जास्त अपील केल्यामुळे कार्तिक चिडला असेल. तो टीमचा वरिष्ठ खेळाडू आहे, पण काहीवेळा अशा गोष्टींमुळे अडचण येऊ शकते, पण तुम्हाला पुढे गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विजय शंकरने दिली.


या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये तामीळनाडूच्या मुरली विजयनेही जास्त प्रमाणात अपील केली होती. यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली होती. तामीळनाडूच्या खेळाडूंनीही मॅच सुरु असताना कर्नाटकच्या बॅट्समनचं स्लेजिंग केलं होतं.


भारतीय क्रिकेटच्या या मोसमात कर्नाटकने तामीळनाडूला विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत केलं होतं. याशिवाय सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या लीग स्टेजमध्येही कर्नाटकचाच विजय झाला होता. आता रणजी ट्रॉफीच्या मॅचमध्येही तामीळनाडूला यश मिळालं नाही. आता या घटनेनंतर कार्तिकवर काय कारवाई होणार, ते पाहावं लागणार आहे.