बिलासपूर :  भारतासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूच्या पत्नीसह कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बाबा समोर आली. छत्तीसगड इथल्या बिलासपूरमध्ये सोमवारी ही घटना घडली. रणजी क्रिकेटपटू अमित मिश्राच्या घरात घुसून कुटुंबावर हल्ला करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लेखोर अमित मिश्राच्या घरी रॉड, फावडं आणि काठ्या घेऊन आले होते. या हल्लेखोरांनी आई-वडील, अमितच्या गर्भवती पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. पत्नी आणि भावाला जास्त दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.


ही घटना जेव्हा घडली तेव्हा अमित मिश्रा अहमदाबादमध्ये रणजी कॅम्पमध्ये होता. अमितच्या पत्नीने या हल्ल्याची माहिती त्याला फोनवरून दिली. त्यानंतर तो कॅम्प सोडून बिलासपूरमध्ये पोहोचला. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. 


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अमित मिश्रा याच्या घराशेजारी घराचं रंगकाम सुरू होतं. त्यावरून अमित मिश्राचे वडील आणि त्यांच्यात वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र अद्याप पोलिसांकडून अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नाही. 


अमित मिश्राने आपल्या करियरची सुरुवात 2008 मध्ये केली होती. पहिल्यांदा तो मध्य प्रदेशच्या टीमकडून खेळला होता. त्यानंतर तो रेल्वे टीमकडून खेळत आहे. सैय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये देखील तो खेळला आहे.