मुंबई : रणजी ट्रॉफी मोसमात मुंबईच्या सरफराज खानने उत्तर प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये त्रिशतकी खेळी केली आहे. सरफराजच्या या खेळीमुळे मुंबईला या मॅचमध्ये मोलाचे ३ पॉईंट्स मिळाले आहेत. उत्तर प्रदेशने ६२५/८ एवढा मोठा स्कोअर करुन त्यांचा डाव घोषित केला होता. विकेट कीपर उपेंद्र यादवने द्विशतक केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरफराज खानने ३९१ बॉलमध्ये नाबाद ३०१ रन केले. यामध्ये ३० फोर आणि ८ सिक्सचा समावेश होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये सरफराजने ६३३ मिनिटं बॅटिंग केली. दोनच दिवसांपूर्वी सरफराजला ताप आला होता, तरी त्याने ही मॅरेथॉन खेळी केली.


मुंबईकडून खेळताना त्रिशतक झळकवणारा सरफराज हा सातवा खेळाडू ठरला आहे. याआधी वसीम जाफर (३०१ आणि ३१४ नाबाद), रोहित शर्मा (३०९ नाबाद), अजित वाडेकर (३२३ रन), सुनील गावसकर (३४० रन), विजय मर्चंट (३५९ नाबाद) आणि संजय मांजरेकर (३७७ रन) या खेळाडूंनी मुंबईकडून खेळताना त्रिशतक केलं होतं. मुख्य म्हणजे हे सगळे खेळाडू भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळले. आता सरफराजला देखील ही संधी मिळते का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


मुंबईने शेवटच्या दिवसाची सुरुवात ३५३/५ अशी केली होती. उत्तर प्रदेशच्या स्कोअरपासून मुंबई २७३ रननी पिछाडीवर होती. दिवसाच्या सुरुवातीला सरफराज १३२ रनवर आणि कर्णधार आदित्य तरे ९ रनवर नाबाद खेळत होते.


सरफराजला पहिले आदित्य तरेने आणि मग शम्स मुलानीने चांगली साथ दिली. आदित्य तरेने १४४ बॉलमध्ये ९७ रन केले, तर शम्स मुलानीने ८२ बॉलमध्ये ६५ रन केले. सरफराज आणि तरे यांच्यात १७९ रनची आणि सरफराज-मुलानी यांच्यात १५० रनची पार्टनरशीप झाली.


सरफराज खानने सिक्स मारून त्याचं त्रिशतक पूर्ण केलं. सरफराजच्या त्रिशतकानंतर मॅच ड्रॉ झाल्याचं घोषित करण्यात आलं. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या आघाडीमुळे मुंबईला या मॅचमध्ये ३ पॉईंट्स मिळाले. मुंबईचा पुढचा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध धर्मशालामध्ये खेळवण्यात येणार आहे.