मुंबई : रणजी ट्रॉफीचा २०१७-१८चा सीझन संपला आहे. फैज फैजलच्या नेतृत्वात विदर्भानं सात वेळा चॅम्पियन असणाऱ्या दिल्लीला धूळ चारली आणि पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये विदर्भाचा ९ विकेटनं विजय झाला. पण या मॅचमध्ये झालेल्या एका घटनेनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. जेंटलमन्स गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळावर या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीचा डावखुरा फास्ट बॉलर कुलवंत खेजरोलियाच्या बाऊन्सरवर विदर्भाचा बॅट्समन वाडकर पिचवरच कोसळला. पण दिल्लीचा कोणताही खेळाडू किंवा अंपायर वाडकरच्या चौकशीसाठी गेला नाही. अखेर दुसऱ्या बाजूला उभा असलेला विदर्भाचा खेळाडू वाडकरच्या मदतीला धावला आणि त्यानं ड्रेसिंग रूममध्ये इशारा करून मदत मागितली.


दिल्लीच्या खेळाडूंवर या प्रकारामुळे अखिलाडू वृत्ती दाखवल्याचा आरोप होत आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळलेल्या या टीमनं धोनीकडून खेळ भावना शिकल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया सोशल नेटवर्किंगवर देण्यात आल्या आहेत.