क्रिकेट समीक्षण, रवि पत्की, मुंबई : पाहायचा पाहायचा म्हणून राहून गेलेला 83 सिनेमा काल पाहिला. सिने समीक्षकाच्या भूमिकेपेक्षा क्रिकेट विषयाचा विद्यार्थी म्हणून तो बघितला गेला हे वेगळं सांगायला नकोच. जेव्हा अशा ऐतिहासिक दस्तावेजाला हात घातला जातो आणि ती घटना आपल्या जगण्यातल्या स्वाभिमानाशी निगडित असते तेव्हा तो सत्याच्या अगदी जवळ असावा,कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली सत्यस्थितीशी छेडछाड होऊ नये ही सामान्य अपेक्षा असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

83 सिनेमा ग्राउंड वरील माहीत असलेल्या कथेपेक्षा ग्राऊंच्या बाहेरील माहित नसलेल्या रंजकतेकरताच उजवा ठरतो. अखेरीस क्रिकेटपेक्षा तो सिनेमाचे मनोरंजन अधिक आहे. एकतर सर्व पात्रांकडून तो तो खेळाडू तंतोतंत उतरण्यासाठी वेगळे परिश्रम घेतले गेले असतील पण सर्व पात्रांना ते तसेच्या तसे उतरवता आलेले नाहीत. 


भारतीय संघात कपिलदेव (रणवीर सिंग) ह्याचा अभ्यास आणि साकारणे दांडग्या अभ्यासासह झाले आहे. कपिल वर्ल्ड कपचा हिरो होता आणि सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे त्यामुळे रणवीर कडून कपिलची भूमिका घोटवून करून घेतली आहे.त्याचा मेक अप, आवाजाचा टोन, जाट हिंदी,क्रियापद विरहित rustic इंग्रजी ,बॉलिंग ऍक्शन,नटराजा शॉट,सिक्सरचा फॉलो थ्रू सगळं गोळीबंद. पण कपिलच्या गडबडीत बाकी खेळाडूंकडे तेव्हढ्या गामभिर्याने फिल्म युनिट ने पाहिलेले नाही असे वाटते.


गावस्करचा USP त्याच्या कमी उंचीत आहे.तो कमीतकमी चार इंच जास्त उंच दाखवला आहे.(स्वतः गावस्कर खुश झाला असेल)गावस्करचा stance क्रिकेटच्या पाठय पुस्तकाला भुरळ पाडणारा होता.तिकडे फिल्म युनिटचे दुर्लक्ष झाले आहे. श्रीकांत बोलला आहे श्रीकांतसारखा पण तसा अजिबात चालला नाही.संधू बुटका दाखवला आहे आणि त्याची ऍक्शन मूळ ऍकशनच्या जवळपास नाही.


बिन्नी फक्त anglo indian दिसतो.त्याच्या बॉलिंग ऍकशनच जे आळूचं फदफद केलय ते तर अति क्लेशकारक. यशपाल,मोहिंदर, किरमाणी, संदीप पाटील बर्याच बाबतीत सत्याच्या जवळ गेले आहेत.त्यात संदीप पाटीलच्या मुलाने (चिराग पाटील) वडिलांची भूमिका तंतोतंत केली आहे. 


चालताना संदिपचं डावं कोपर बाहेर येतं ते त्याने परफेक्ट दाखवले आहे.तसेच बॅटची लाँग हँडल ग्रीप, बॉलपाशी न पोचता दोन्ही पाय क्रिझ मध्ये घट्ट ठेऊन(फुटवर्क)शिवाय मारलेले शॉट अविश्वसनीय आहेत. त्या करता त्याने वडीलांबरोबर खूप चर्चा केली,खूपदा videos पाहिले असे एका मुलाखतीत सांगितले हे लगेच पटते. यशपालचा stance, बॅट ग्रीप,दोन्ही पाय एकदम जवळ घेऊन उभं रहायची पद्धत उत्कृष्ट साकारली गेली आहे तसेच मोहिंदरचा आळोखे पिळोखे देत असलेला रन अप, चेस्ट ऑन stance उत्तम. श्रीकांतचा एक मोनोलॉग अप्रतिम. तसेच ईस्ट आफ्रिकेच्या टीमचं वर्णन हसून हसून खुर्चीतून पाडणारं. किरमाणी परफेक्ट.


वेस्ट इंडीजचे ग्रीनिज,लॉइड, गोम्स,दुजॉन सोडले तर बाकी खेळाडू असेच कॅरबीयन समुद्रावरून उचलून आणल्यासारखे वाटतात.होल्डिंग आणि रॉबर्ट्स ला शून्य मार्क.गार्नर च्या उंचीने तारले.otherwise इतक्या उंच माणसाच्या डोक्यापर्यंत भूमिकेचा अभ्यास पोचणे अवघडच.रिचर्ड्सचा swag सोडा तो तर प्राथमिक शाळेचा शोषित मास्तर किंवा कॉलेज सुटल्या नंतरही तीन तास कॉलेज मध्ये ड्युटी करावा लागणारा हतबल ग्रंथपाल वाटतो.


सगळ्या मॅचेस मधल्या सगळ्या विकेट्स दाखवल्याने सिनेमा ताणला जाऊन कंटाळवाणा देखील होतो.फक्त कपिलच्या 175, सेमी फायनल,फायनल डिटेल दाखवल्या असत्या तर बरे झाले असते.विशेषतः 83 साली live मॅचेस पाहिलेल्या आणि नंतर त्याची अगणित वेळा पारायणे केलेल्याना त्याचे सिनेमाकरण बोअर होते. (सध्या ऑलरेडी एव्हढे क्रिकेट बघितले जाते त्यामुळेही एक क्रिकेट fatigue कारणीभूत असेल).सायमंडस, ग्रेनिकल्स, गन अँड मूर,डनकन फर्नले,स्लॅझेंजर ह्या बॅट कुणी कुणी वापरल्या तेही बरोबर दाखवले आहे. फायनल चा थरार आणि विजयाचा क्षण हा सर्वोच्य भावनाबिंदू मस्त create केला आहे.


मॅनेजर मानसिंग यांची भूमिका करणाऱ्या पंकज त्रिपाठीला फुल मार्क्स. त्याच्या दखनी(हैद्राबादी) उर्दूने मजा आणली आहे. 'नट' आणि नटबोल्ट मधला फरक तो लगेच दाखवून देतो. आधीच लिहिल्याप्रमाणे रणवीर सिंग केवळ अप्रतिम.रोमीचा मेकअप परफेक्ट.शेषराव वानखेडे यांच्या भूमिकेत सतीश आळेकरांपेक्षा कोणीतरी वेगळं मिळालं असतं. 


फोटोग्राफी आणि इतर तांत्रिक बाजू उत्तम. एकूण अशा प्रकारच्या दिव्य घटनेवरच्या सिनेमाने स्मरणसंजीवन करायला हवे. पण 83 फक्त स्मरणरंजन करतो. एकदा पहायला नक्कीच हरकत नाही.