मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी दारुण पराभव झाला. या पराभवामुळे भारत ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं पिछाडीवर आहे. या पराभवानंतर भारतीय टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे. रवी शास्त्री हा ग्रेग चॅपलपेक्षाही धोकादायक आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना भारतीय क्रिकेटचं जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा जास्त नुकसान शास्त्रीमुळे होईल, अशी चिंता क्रिकेट रसिकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे रवी शास्त्रीवर अशाप्रकारे टीका होत असताना भारतीय ए टीम आणि अंडर १९ टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं वेगळाच आदर्श घालून दिला आहे.


भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं राहुल द्रविडचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये भारतीय ए टीमचे खेळाडू पुढच्या रांगेत बसले आहेत. तर राहुल द्रविड मागच्या रांगेमध्ये उभा आहे. माझे रणजी आणि भारतीय ए टीमचे प्रशिक्षक नेहमी पुढच्या रांगेत बसायचे. पण राहुल द्रविड मागच्या रांगेत उभा आहे. सन्मान... सगळ्यात पहिले खेळाडू... महान... अशी पोस्ट आकाश चोप्रानं शेअर केली आहे.