वेलिंग्टन : भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पिनर कुलदीप यादवचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये झालेल्या टेस्टचा दाखला देताना शास्त्री म्हणाले 'परदेशातल्या मॅचमध्ये अनुभवी अश्विनऐवजी कुलदीप यादव भारतीय टीमचा प्रमुख स्पिनर असेल.' कुलदीप हा आधीच अश्विन आणि जडेजाच्या पुढे गेला आहे आणि तो भारताचा एक नंबरचा स्पिनर आहे, असंही शास्त्रींनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कुलदीप यादव परदेशात टेस्ट मॅच खेळला आहे आणि त्यानं ५ विकेटही घेतल्या आहेत. त्यामुळे तो आमचा मुख्य स्पिनर असेल.' अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी एका वेबसाईटशी बोलताना दिली. अश्विनच्या खराब फॉर्मवर बोलताना शास्त्री म्हणाले 'प्रत्येकाची वेळ असते, पण आता कुलदीप परदेशामध्ये आमचा मुख्य स्पिनर असेल.'


पावसानं प्रभावित झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी टेस्टमध्ये कुलदीप यादवनं ५ विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समनना कुलदीप यादवच्या बॉलिंगवर खेळताच येत नव्हतं. कुलदीपच्या बॉलिंगनं आपण प्रभावित झालो आहोत. सध्याचा जमाना हा मनगटानं बॉल वळवणाऱ्या स्पिनरचा आहे, असं शास्त्रींना वाटतं.


सध्याची भारतीय टीम ही मागच्या १५-२० वर्षांमधली परदेश दौरा करणारी सर्वोत्तम टीम असल्याचं शास्त्री इंग्लंड दौऱ्यावेळी म्हणाले होते. शास्त्रींच्या या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. 


इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंघम टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराला ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारानं शानदार कामगिरी केली. चेतेश्वर पुजारा भारताच्या ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिज विजयाचा शिल्पकार ठरला. पुजाराच्या या कामगिरीमुळे भारताला पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकता आली. पण पुजाराला बर्मिंघम टेस्टवेळी टीमबाहेर ठेवण्यात आल्याबद्दलही शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली. 'पुजाराच्या तंत्रामध्ये अडचण नव्हती. क्रीजमध्ये उभं राहण्याच्यी त्याची पद्धत हे कारण होतं. ही काही मोठी गोष्ट नव्हती. जेव्हा तुम्ही एवढं क्रिकेट खेळता तेव्हा तुमच्यासोबतही असं होऊ शकतं,' असं शास्त्रींनी सांगितलं.


'पहिल्या टेस्टमध्ये (इंग्लंडविरुद्ध) पुजाराला न खेळवून पुढच्या सात-आठ मॅचमध्ये पुजाराला सुधारण्याची संधी द्यायची जोखीम आम्ही पत्करली. त्याला सगळ्या मॅचमध्ये खेळवलं असतं, तर सुधारणा करायची संधी मिळाली नसती', असं शास्त्री म्हणाले.


विराटचं पुन्हा कौतुक


रवी शास्त्रींनी बोलताना पुन्हा एकदा कर्णधार विराट कोहलीचं कौतुक केलं. शास्त्रींनी कोहलीची तुलना वेस्टइंडिजचे महान बॅट्समन व्हिव्हियन रिचर्ड्स आणि माजी पाकिस्तानी कर्णधार इम्रान खान यांच्याशी केली. 'विराट कोहली उत्तर देणाऱ्या महान खेळाडूंपैकी एक आहे. तो प्रभाव टाकून क्रिकेट खेळू इच्छितो. त्याच्याएवढा प्रतिबद्ध खेळाडू मी दुसरा कोणताच बघितला नाही. त्याच्यासारखा कर्णधार मिळणं भारतासाठी भाग्याचं आहे. विराटला बघून मला इम्रान खान यांची आठवण येते'. असं विधान शास्त्रींनी केलं.