रवी शास्त्रीचा ४ वर्ष जुन्या `धोनी`च्या टीमवर निशाणा
भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री कॅप्टन विराट कोहली आणि त्याच्या टीमचं तोंड भरून कौतुक करत आहेत.
केपटाऊन : भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री कॅप्टन विराट कोहली आणि त्याच्या टीमचं तोंड भरून कौतुक करत आहेत. पण या टीमची तारीफ करताना शास्त्रींनी अप्रत्यक्षरित्या ४ वर्षांपूर्वीच्या भारतीय टीमवर निशाणा साधला आहे. ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या टेस्ट सीरिजआधी रवी शास्त्रींनी एका मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं आहे.
'टीम पूर्णपणे तयार'
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच मायभूमीमध्ये आव्हान द्यायला टीम पूर्णपणे तयार आहे. या टीममध्ये अनुभव आणि मजबूत राखीव खेळाडू आहेत, असं शास्त्री म्हणालेत.
२०१३ सालच्या टीमवर निशाणा
हे वक्तव्य करताना शास्त्रीनं २०१३ साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या टीमवर निशाणा साधला आहे. हा प्रश्न तुम्ही ४ वर्षांपूर्वी विचारला असता तर माझं उत्तर नाही असतं, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली आहे.
२०१३ सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सध्याच्या टीममधले बरेच खेळाडू होते. २०१३ सालच्या दौऱ्यात महेंद्रसिंग धोनी टीमचा कॅप्टन होता तर विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा उमेश यादव आणि मोहम्मद शमी होते.
दोन्ही टीममध्ये फरक काय?
२०१३ सालची टीम आणि आत्ताची टीम यामध्ये जास्त फरक नसला तरी त्या टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी होता. तर बॅट्समनच्या यादीमध्ये केएल राहुल नवीन नाव आहे. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह हे नवे बॉलर्स असतील.
दोन्ही टीममध्ये फार फरक नसला तरी सध्याच्या टीममध्ये जास्त विश्वास आहे तर आधीची टीम कमजोर होती, असं शास्त्री म्हणालेत. या टीममध्ये असलेल्या बुमराह, भुवनेश्वर आणि हार्दिक पांड्याला परदेशात खेळण्याचा जास्त अनुभव नाही.