मुंबई : टीम इंडियाचा मुख्य कोच म्हणून रवी शास्त्रीची निवड करण्यात आली आहे. याचबरोबर झहीर खान हा बॉलिंग कोच तर राहुल द्रविड हा परदेश दौऱ्यावेळी टीम इंडियाचा बॅटिंग कोच असेल. पण झहीर खान बॉलिंग कोच असतानाही रवी शास्त्रीला भरत अरुण हा बॉलिंग कोच हवा आहे. बॉलिंग कोचची निवड करताना गांगुली, सचिन आणि लक्ष्मणच्या सल्लागार समितीनं शास्त्रीची सल्लामसलत केलं नसल्याचंही आता समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आठवड्यामध्ये शास्त्री बीसीसीआयच्या अधिकारी आणि सल्लागार समितीशी अरुणच्या नावावर चर्चा करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रवी शास्त्री झहीर खानचा पूर्ण सन्मान करतो पण टीमला पूर्ण वेळ कोचची गरज असल्याचं शास्त्रीचं मत आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं आहे. झहीर खान भारतीय बॉलरसाठीचा रोड मॅप तयार करेल आणि त्याची अंमलबजावणी अरुण करेल असा रवी शास्त्रीला विश्वास आहे. या शनिवारी शास्त्री सल्लागार समितीशी बोलून अरुण श्रीलंका दौऱ्यापासूनच कोच म्हणून हवा असल्याची मागणी शास्त्री करू शकतो.


झहीर खान पूर्ण २५० दिवस हा टीम इंडियाच्या खेळाडूंना वेळ देऊ शकणार नाही. झहीर हा फक्त १०० दिवसच टीम इंडियाबरोबर असेल. एवढच नाही तर झहीरची निवड झाली असली तरी त्याच्या मानधनाबाबत मात्र अजून कोणताही निर्णय झालेला नाही.


शास्त्रीला बॉलिंग कोचच्या नावाची विचारणा केली असता त्यानं भरत अरुणच्या नावाला पसंती दिली. पण सल्लागार समितीतल्या एका सदस्याचा अरुणच्या नावाला विरोध होता. अरुणच्या नावाचा विरोध लक्षात येताच शास्त्रीनं जेसन गिलेस्पीचं नाव सुचवलं पण गिलेस्पी सध्या पापुआ न्यूगिनीचा कोच असल्यामुळे तो टीम इंडियाचा कोच होऊ शकत नाही.


वैंकटेश प्रसादच्या नावावरही सहमती नाही


वैंकटेश प्रसादचं नाव सल्लागार समितीनं स्टँड बाय ठेवलं होतं पण शास्त्रीभरत अरुणशिवाय कोणत्याच नावावर सहमती करायला तयार नसल्याची माहिती आहे.


गांगुलीला प्रत्युत्तर देण्यासाठी अरुणच्या नावाचा अट्टाहास?


रवी शास्त्रीचा अरुणसाठीचा अट्टाहास म्हणजे सौरव गांगुलीला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असल्याच्याही चर्चा आहेत. सौरव गांगुली आणि रवी शास्त्रीमध्ये मागच्या वर्षी कोच निवडीवरून वाद झाले होते. रवी शास्त्री २०१४ ते २०१६ टीम इंडियाचा डायरेक्टर असताना अरुण हाच टीम इंडियाचा बॉलिंग कोच होता पण २०१६ साली शास्त्रीला बाहेरचा रस्ता दाखवल्यावर अरुणलाही डच्चू देण्यात आला होता.


जुनी आहे शास्त्री-अरुणची मैत्री


अंडर १९ च्या दिवसांपासूनच शास्त्री आणि अरुणची मैत्री आहे. खेळाडू म्हणून अरुणचं प्रदर्शन फारसं चांगलं नसलं तरी त्यांना एक उत्कृष्ट अकॅडमी कोच म्हणून ओळखलं जातं. शास्त्रीनं शिफारस केल्यावरच बीसीसीआयचे तत्कालिन अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी अरुणची टीम इंडियाचा बॉलिंग कोच म्हणून निवड केली होती. त्याआधी अरुण नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे कोच होते.